पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असणाऱ्या एकाला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी मध्यरात्री पकडले.बबिता राकेश निषाद (वय २५, रा. समृद्धगिरी बिल्डिंग, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राकेशकुमार रामनायक निषाद (वय २८) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस शिपाई ज्ञानेश्वर आखाडे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निषाद दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री परिसरातील आहे. दहा वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोघे जण रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. राकेश मजुरी करत होता. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद होत होते.
खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह त्याने चादरीत गुंडाळला. एका पोत्यात घातला. राकेश दुचाकीवरून मृतदेह घेऊन मध्यरात्री एकच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाला. दरी पूल परिसरात पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत तो होता. त्या वेळी पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर आखाडे आणि नील लोंढे गस्त घालत होते. दोघांनी राकेशला पाहिले. संशयावरून त्यांनी स्वामी नारायण मंदिराजवळ त्याला थांबण्याचा इशारा केला. पोलिसांना पाहताच तो दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून पळाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याची चौकशी केली, तेव्हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली
मुलासमोर पत्नीचा खून
सोमवारी (५ मे) रात्री नऊच्या सुमारास राकेश आणि बबिता यांच्यात वाद झाले. त्या वेळी त्यांचा आठ वर्षांचा मुलगा घरात होता. मुलासमोर त्याने पत्नी बबिताचा गळा आवळून खून केला. मुलाला दुकानातून खाऊ आणून दिला. त्याला घरात झोपविले.
याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे गुन्हा उघडकीस आला.अतुल भोस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नांदेड सिटी पोलीस ठाणे</p>