पुणे : शहरातील एका नामवंत शिक्षण संस्थेत प्रवेशाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या, तसेच शैक्षणिक संस्थेच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोलकाता विमानतळावरून ताब्यात घेतले. पत्नीसह थायलंडला पर्यटनासाठी जात असताना आरोपीला सापळा लावून पोलिसांनी पकडले.

पसार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी ‘लूकआउट नोटीस’ बजाविली होती. कुणालकुमार बीरेंद्रकुमार बिद्यार्थी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सेनापती बापट रस्त्यावरील एका शैक्षणिक संस्थेच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आले होते. या संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात २ एप्रिल रोजी आरोपी कुणालकुमार बिद्यार्थी, साथीदार आकाश यादव आणि दिव्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते.

गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांचा दिल्ली, तसेच हरियाणात शोध घेतला होता. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. पोलिसांनी त्यांना दिसताक्षणी अटक करण्याची नोटीस (लूक आउट नोटीस) बजावली होती. आरोपी बिद्यार्थी मूळचा बिहारमधील असून, त्याच्याविरुद्ध २०२१ मध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला पकडण्यासाठी पथके तयार केली होती. पुणे, मुंबई, दिल्लीत त्याचा शोध घेण्यात येत होता. बिद्यार्थी हा पत्नीसह थायलंडला निघाला असून, तो कोलकाता विमानतळावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने कोलकाता विमानतळ परिसरात सापळा लावून त्याला पकडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत (५ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, प्रवीण उत्तेकर, दत्ताराम जाधव, संदीप शिर्के, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे यांनी ही कामगिरी केली.