लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सराईत गुन्हेगाराने धावत्या रेल्वेतून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आईवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आर्या आकाश भोसले (वय २, रा. पद्मावती) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई वृषाली (वय २२) गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आकाश भोसले याच्या विरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकाश सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल आहेत. कौटुंबिक वादातून त्याने पहिल्या पत्नीचा खून केला होता. सध्या तो कारागृहातून जामीन मिळवून बाहेर आला आहे.

आणखी वाचा- दौंडजवळ रेल्वेगाडीखाली उडी मारुन नवविवाहित तरुणाची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी (१९ मार्च) आरोपी आकाश पत्नी वृषाली आणि मुलगी आर्याला घेऊन मुंबईला निघाला होता. हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी जायचे आहे, असे त्याने पत्नीला सांगितले होते. प्रगती एक्सप्रेसमधून ते निघाले होते. खडकी रेल्वे स्थानक परिसरात त्याने पत्नीला दरवाज्यात बोलावले. वृषालीच्या कडेवर आर्या होती. धावत्या रेल्वेतून दोघींना आकाशने ढकलून दिले. प्रवाशांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी साखळी ओढून गाडी थांबविली. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आर्याचा मृत्यू झाला, असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी सांगितले. लोहमार्ग पोलिसांनी आकाशला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सुप्रिया जगताप तपास करत आहेत.