धुळे : धुळे कृषी महाविद्यालयाचे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठापासून विभाजन करून स्वतंत्र धुळे कृषी विद्यापीठ स्थापन करावे, या मागणीला राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा खासदार डाॅ. शोभा बच्छाव यांनी करताच नियोजित कृषी विद्यापीठ निर्माण सर्वपक्षीय कृति समितीचे निमंत्रक तथा माजी आमदार शरद पाटील यांनी आपणच या कृषी विद्यापीठासाठी पाठपुरावा केल्याने हा विषय मार्गी लागल्याचा प्रतिदावा केला आहे. विशेष म्हणजे, कृषिमंत्र्यांनी केवळ आश्वासन दिले असतानाही विद्यमान खासदार आणि माजी आमदार यांच्यात श्रेयवादासाठी लढाई सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
धुळे लोकसभा मतदार संघातील धुळे शहरात सुमारे ५०० एकर जागेवर धुळे कृषी महाविद्यालय असून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी (राहुरी) संलग्न आहे. हे कृषी महाविद्यालय धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी कृषी शिक्षण,संशोधन आणि तंत्रज्ञान सेवा पुरविण्याचे काम करीत आहे. या महाविद्यालयात बी.एस्सी. (कृषी) आणि एम.एस्सी.(कृषी) अभ्यासक्रम शिकवले जातात. राहुरी कृषी विद्यापीठाचा विस्तार मुळातच मोठा असल्याने विद्यापीठ व्यवस्थापनाला उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात देखरेख ठेवणे किंवा कारभारावर अपेक्षित नियंत्रण ठेवणे कुलगुरूंसह प्रशासनाच्या दृष्टीने मोठी अडचण ठरत असते.
या अनुषंगाने धुळे शहरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ झाल्यास या क्षेत्राशी संबंधित प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे खासदार बच्छाव यांनी कृषिमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कृषी शिक्षण, कृषी संशोधन, कृषी विस्तारालाही चालना मिळेल. धुळे जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भाग हा शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. कृषी विभाग,तंत्रज्ञान व मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल. धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. धुळे जिल्ह्यातील नागरिकही यासाठी सातत्याने आंदोलन करीत आले आहेत, अशी माहिती मंत्री कोकाटे यांना यावेळी देण्यात आली.
खासदार बच्छाव यांनी धुळे येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठाचे महत्व कृषिमंत्री कोकाटे यांना पटवून दिले. याबाबत मंत्री कोकाटे यांनी सकारात्मक चर्चा करुन धुळ्यात लवकरात लवकर स्वतंत्र कृषी विद्यापीठ होईल, असे आश्वासन दिल्याचा दावा खासदार बच्छाव यांनी केला आहे.
दरम्यान, खासदार बच्छाव यांच्या दाव्यानंतर धुळे कृषी विद्यापीठासाठी लढा देणारे माजी आमदार शरद पाटील हे आक्रमक झाले. आमदार अनुप अग्रवाल यांनीही आपल्याकडून आवश्यक ती माहिती घेतली होती. गेल्यावेळी झालेल्या विधानसभा अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून धुळे येथे मागणी होत असलेल्या स्वतंत्र कृषी विद्यापीठाचे महत्व अधोरेखित केले होते, याची आठवण शरद पाटील यांनी करून दिली.
स्वतंत्र कृषी विद्यापीठाची मागणी आपण लावून धरली आहे. यासाठी २०१५ मध्ये जवळपास २० हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. आजवर सर्वच लोकप्रतिनिधी आणि तत्कालीन मंत्र्यांनीही यासाठी सकारात्मकता दर्शविली, पण प्रत्यक्षात मात्र त्या-त्या काळात प्रत्येकाने आपआपल्या मतदार संघाला प्राधान्य दिले. त्यामुळे धुळे येथील स्वतंत्र कृषी विद्यापीठाची मागणी रेंगाळत राहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून या विद्यापीठाचे महत्व आपण त्यांना सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या सुचनेनंतर झालेल्या पुणे येथील बैठकीत कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्याशी आपण या विषयावर चर्चा केली. यामुळेच खरे यश मिळत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.