पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्या प्रकरणी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पौड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी सोमवारी दिले. त्यामुळे खेडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.दरम्यान, खेडकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी पौड न्यायालयात अर्ज केला आहे.

मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप, अंगरक्षकासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना महाड परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली. याबाबत शेतकरी पांडुरंग कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव पुनर्वसन, ता. दौंड) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड: शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांच्या आमदारांची नाराजी; अमित शहांनी केली होती जहरी टीका

मनोरमा खेडकर यांच्या पोलीस काेठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने शनिवारी (१९ जुलै) दिले हाेते. खेडकर यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी खेडकर यांना पौड येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने खेडकर यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुळशीत शेतकऱ्याला धमकाविल्याप्रकरणी खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. खेडकर यांच्या बंगल्यातून शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी त्यांना शस्त्रपरवाना रद्द का करू नये, अशी नोटीसही बजाविली होती.