पुणे : आखाड महिन्यातील शेवटच्या रविवारी सामिष खवय्यांचा हिरमोड झाला. एकादशीमुळे अनेकांनी मटण, मासळी, चिकन खरेदीकडे पाठ फिरवली.

श्रावण महिन्याच्या प्रारंभ येत्या शुक्रवारी (२९ जुलै) होणार आहे. व्रतवैकल्यांच्या श्रावण महिन्यात सामिष पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते. त्यामुळे आषाढ महिन्यात मटण, चिकन, मासळीला खवय्यांकडून मागणी असते. रविवारी मटण, मासळी, चिकनच्या मागणीत मोठी वाढ होते. आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी (२४ जुलै) एकादशी असल्याने खवय्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली. एकादशीच्या दिवशी सामिष पदार्थांचे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे मागणीत घट झाल्याचे मटण, मासळी, चिकन विक्रेत्यांनी सांगितले.

मटण, चिकनच्या तुलनेत मासळीला बरी मागणी राहिली, असे गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. पापलेट, कापरी, सुरमई, कोळंबी, रावस, हलवा या मासळींचे दर तेजीत आहेत. खाडीतील मासळीची आवक वाढली असून दरात घट झाली आहे. खवय्यांकडून खोल समुद्रातील मासळीला मागणी असते. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १२ ते १४ टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची १५ ते २० टन, खाडीतील मासळी ६०० ते ७०० किलो, नदीतील मासळी ८०० ते एक हजार किलो अशी आवक झाली, असे ठाकूर परदेशी यांनी सांगितले. शहरातील कसबा पेठ, भवानी पेठ, फर्ग्युसन रस्ता, कर्वे रस्ता तसेच लष्कर भागातील मटण मार्केटमध्ये फारशी गर्दी नव्हती. आषाढातील रविवारी मटणाच्या मागणीत मोठी वाढ होते. मात्र, शेवटच्या रविवारी एकादशी आल्याने खवय्यांकडून मागणी कमी राहिली, असे पुणे मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. बाजारात मागणीच्या तुलनेत चिकनची आवक चांगली होती. मात्र, एकादशीमुळे ग्राहकांची मागणी कमी राहिली, असे पुणे ब्रॅायलर ट्रेडर्स संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.

घरगुती ग्राहकांकडून मटण, मासळी, चिकनला मागणी कमी राहिली. हाॅटेल व्यावसायिकांकडून चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सामिष खवय्यांकडून येत्या मंगळवारी (२६ जुलै) आणि बुधवारी (२७ जुलै) चांगली मागणी राहील. गुरुवारी (२८ जुलै) अमावस्या असून आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आहे. गुरूवारी अनेकजण सामिष पदार्थांचे सेवन करत नाहीत.

मटण, चिकनचे दर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मटण– ७०० रुपये किलोचिकन- २०० ते २२० रुपये किलो