लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्कात महायुती आणि महाविकास आघाडीमधील अनेक मातब्बर नेते आहेत. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच हे नेते मनसेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास सावध भूमिका घेण्यासंदर्भातील चर्चा मनसेच्या बैठकीत सोमवारी करण्यात आली. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांना मनसेकडून पायघड्या घातल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी मनसेकडे सक्षम नेत आहेत, मात्र अन्य पक्षातील नेत्यांसंदर्भातील निर्णय राज ठाकरे यांच्या रविवारी (१३ ऑगस्ट) होणाऱ्या सभेनंतरच स्पष्ट होईल, असा दावाही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

आणखी वाचा-Sushma Andhare : सुषमा अंधारेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर; पुण्यातील जागांबाबत मोठं वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीवेळी ही चर्चा करण्यात आली. जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, असा आदेशही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. मनसे नेते शिरीष सावंत, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, राजेंद्र वागासकर, अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह सरचिटणीस बाळा शेडगे, किशोर शिंदे, अजय शिंदे, हेमंत संभूस, सचिव योगेश खैरे,शहराध्यक्ष साईनाथ बाबर उपस्थित होते.

राज्यातील जनता महायुती आणि महाविकास आघाडीच्या सत्ताकेंद्रीत वृत्तीला कंटाळली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे हा समक्ष पर्याय आहे. निवडणुकीची लढाई जनता विरोधात आजचे आणि कालचे सत्ताधारी अशी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या लढाईला सामोरे जावा, अशी सूचना ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली.

आणखी वाचा-अब्जावधी प्रकाशवर्षे दूरच्या कृष्णविवराबाबत महत्त्वाचा शोध…

दरम्यान, राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील अनेक मातब्बर नेते मनसे पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. निवडणूक लढविण्यासंदर्भात मनसेकडे सक्षम नेते आहेत. मात्र काही ठिकाणी उमेदवार नसतील किंवा ते सक्षम नसतील तर, संपर्कात असलेले अन्य पक्षातील नेत्यांना मनसेत घेण्यासंदर्भातील भावना पदाधिकाऱ्यांनी सातत्याने वरिष्ठ नेत्यांना कळविली आहे. त्यादृष्टीनेही या बैठकीत चर्चा झाली. त्याबाबत अद्यापही अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, पदाधिकाऱ्यांची भावना पुन्हा बैठकीत मांडण्यात आली. राज ठाकरे यांचा येत्या रविवारी मुंबईत मेळावा होणार आहे. त्यानंतर त्यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती मनसे नेते राजेंद्र वागसकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी त्यांची भावना यापूर्वीच वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविली आहे. या बैठकीत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. निवडणुकीसाठी तयारीली लागण्याचे आदेश बैठकीत देण्यात आल्याचे मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले.