मराठा क्रांती मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी शहरातील विविध रस्ते बंद ठेवण्यात आले होते. शहरातील एसटी स्थानकांमध्ये सकाळी प्रवासीच नसल्याने काही गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. त्याचप्रमाणे शहरांतर्गत प्रवासावरही मोर्चाचा परिणाम दिसून आला. पीएमपी बसच्या सुमारे दीड हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दैनंदिन उत्पन्नात सुमारे चाळीस लाखांची घट झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोर्चा सकाळी साडेदहाला निघणार होता, तरी सकाळी सहापासूनच शहरातील रस्त्यांवर गर्दी होऊ लागली होती. शहरांतील पेठा तसेच डेक्कन भागाकडे येणारे सर्व रस्ते सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले होते. मोर्चा व रस्ते बंद राहणार असल्याची माहिती असल्याने मोर्चात सहभागी होणारे समाजबांधव वगळता इतर अनेक नागरिकांनी सार्वजनिक किंवा खासगी वाहनांतून प्रवास टाळला. शहराबरोबरच सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, पुणे-मुंबई महामार्ग, चांदणी चौक आदी भागातून समाजबांधव खासगी वाहनांनी शहरात दाखल झाले होते. त्या-त्या रस्त्यांवरून शहरात दाखल होण्याच्या ठिकाणांवर वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती.

एसटीच्या वाहतुकीबाबत विभाग नियंत्रक नितीन मईद म्हणाले की, सकाळी प्रवासी नसल्याने दुपारी बारापर्यंत एसटी  स्थानकांवरून विविध गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. पुणे स्टेशन स्थानकातून िपपरी-चिंचवडमधून इतरत्र जाणाऱ्या गाडय़ा औंधमार्गे सोडण्यात आल्या. डेक्कनमार्गे जाणाऱ्या गाडय़ा पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. दुपारी साडेचारनंतर मोर्चेकऱ्यांची गर्दी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

पीएमपी बसच्या सकाळच्या सत्रामधील दीड हजाराहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे पीएमपीचे उप्तन्न सुमारे चाळीस लाखांनी कमी झाले. पाषाण, औंध, सांगवी, बाणेर या मार्गाने येणाऱ्या गाडय़ा विद्यापीठ चौकात थांबविण्यात आल्या. िपपरी-चिंचवड, खेड, मोशी या भागातून येणाऱ्या गाडय़ा शिवाजीनगरच्या अलीकडेच थांबविण्यात येत होत्या. काही

गाडय़ा एसएनडीटी, नळस्टॉप परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी याबाबतची माहिती दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha morcha affected on pune bus services
First published on: 26-09-2016 at 01:30 IST