पुण्यामध्ये मंगळवार संध्याकाळपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी काही फूटांपर्यंत पाणी साचले. पुणे शहरात झालेल्या ढगफुटीमुळे अनेक वस्त्या आणि नागरी वसाहतींना पावसाच्या पाण्याचा तडाखा बसला. मृण्मयी देशपांडेची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुण्यातील परिस्थितीबाबत सांगितले. त्याचप्रमाणे तिने नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
”मध्यरात्रीपासूनच संपूर्ण पुणे शहराचा वीजपुरवठा बंद आहे. पावसाच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत तर काही अडकल्या आहेत. आम्हीसुद्धा मदतीसाठी बाहेर पडलो आहोत,” असं म्हणत तिने पुणेकरांना जमेल तितकी मदत करण्याची विनंती केली आहे.
मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रुद्रावतार धारण केला. सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. पुण्यात पावसामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.