लक्ष्मीपूजनानिमित्त झेंडूला मोठी मागणी असते. जेजुरीतील झेंडू बाजारात शनिवारी झेंडूला प्रतिकिलोमागे तीन ते पाच रुपये किलो भाव मिळाला. झेंडू खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यातच दसऱ्याच्या तुलनेत झेंडूला भाव कमी मिळाल्याने शेतक ऱ्यांनी झेंडू फेकून दिला. जेजुरीतील प्रसिद्ध झेंडू बाजारात झेंडूला फारशी मागणी नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, पुण्यात किरकोळ विक्रेत्यांनी झेंडू तीस ते चाळीस रुपये किलोने विकला.
पुरंदर तालुक्यातील शेतक ऱ्यांनी यंदा झेंडूचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले होते. दसऱ्याच्या दिवशी जेजुरीतील बाजारात झेंडूला प्रतिकिलो दहा रुपये असा भाव मिळाला होता. दिवाळीत चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतक ऱ्यांना होती. त्यामुळे झेंडूचे मळे (फड) राखून ठेवण्यात आले होते. जेजुरीतील प्रसिद्ध झेंडू बाजारात शुक्रवारपासून (२७ ऑक्टोबर) आवक सुरु झाली. पुरंदर तालुक्यातून सर्वाधिक आवक झाली. यंदा व्यापाऱ्यांची संख्या कमी असल्याने झेंडूची विक्री कमी झाली.
झेंडूला प्रतिकिलो तीन ते पाच रुपये असा भाव मिळाल्याने शेतकरी नाराज झाले. त्यामुळे अनेक शेतक ऱ्यांनी बाजारातील मैदानावर झेंडू फेकून दिला.
मार्केटयार्डात एकशेवीस टन आवक
गुलटेकडी मार्के टयार्डातील घाऊक फुलबाजारात एकशेवीस टन झेंडूची आवक शनिवारी झाली. झेंडूच्या प्रतवारीनुसार घाऊक बाजारात दोन ते वीस रुपये किलो असा भाव मिळाला. वाहतुकीचा खर्च निघाला नाही. त्यामुळे शेतकरी नाराज झाले. गेल्या वर्षी घाऊक बाजारात झेंडूला तीस ते पन्नास रुपये असा भाव मिळाला होता. तर गेल्या वर्षी किरकोळ बाजारात झेंडूचा प्रतिकिलोचा भाव शंभर रुपयांच्या पुढे होता. पुणे जिल्ह्य़ासह, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्य़ातून झेंडूची आवक झाली. फुलांची मोठी आवक फुलबाजारात झाली.
अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी नाराज झाले, अशी माहिती फुलबाजारातील प्रमुख विक्रेते अरुण वीर यांनी दिली. दरम्यान, पुणे शहर आणि उपनगरात रस्त्याच्या कडेला किरकोळ विक्रेत्यांनी झेंडूची विक्री केली. किरकोळ विक्रेत्यांनी तीस ते चाळीस रुपये किलो अशा भावाने झेंडूची विक्री केली.