पुणे : करोनाकाळात बालकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम विस्कळीत झाल्याने आता गोवरचा उद्रेक झाल्याचा निष्कर्ष बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी काढला आहे. करोनाकाळातील प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमावर विपरित परिणाम झाला. वेळीच लसीकरण न झालेल्या भागांत आता प्रामुख्याने गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. 

करोना साथरोग नियंत्रणासाठी जगभरातील सर्व कारभार ठप्प झाले. करोनावरील उपचार आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवांव्यतिरिक्त आरोग्य सेवांचे प्राधान्यक्रमही बदलले. त्यातच घराबाहेर पडणे, एकत्र येणे, सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रुग्णालयांसारख्या ठिकाणी गेल्याने करोना संसर्गाची शक्यता असल्याने बालकांच्या नियमित लसीकरण रखडले. बालकांना घेऊन घरातून बाहेर पडणे जोखमीचे वाटल्याने अनेक बालके काळात नियमित लसीकरणापासून वंचित राहिली. राज्यातील गोवर उद्रेकाची सद्यस्थिती पाहिल्यास नियमित लसीकरण न झालेल्या भागांमध्ये गोवरची लक्षणे असलेले रुग्ण अधिक दिसत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टर नोंदवत आहेत. 

राज्याच्या गोवरविषयक कृती दलाचे सदस्य आणि राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, करोनाकाळात अनेक कारणांमुळे बालकांचे नियमित लसीकरण घटलेले पाहायला मिळाले. ज्या भागात लस न घेतलेली अनेक मुले आहेत, अशा भागांत आता प्रामुख्याने गोवरचे रुग्ण आहेत. मुंबई, मालेगाव, भिवंडी, पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी अशा भागांमध्ये गोवरचा संसर्ग झालेल्या बालकांपैकी ८० टक्के बालकांनी लस घेतलेली नाही, हे दिसून आले आहे. गोवरमुळे दगावलेल्या बालकांमध्ये प्रामुख्याने कुपोषित बालकांचा समावेश आहे. त्यामुळे या उद्रेकाची पाळेमुळे करोना काळातील बिघडलेल्या लसीकरण वेळापत्रकाशी आहे, याबाबत शंका नाही, असेही डॉ. जोग यांनी स्पष्ट केले.

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात गोवरचे संशयित तसेच संसर्ग झालेले रुग्ण येत आहेत. मात्र, या निमित्ताने रुग्णालयात येणाऱ्या बालकांना गोवर लस देण्याची संधी आम्ही घेत आहोत. लसीकरणाची टक्केवारी पूर्ववत होईपर्यंत गोवरच्या लक्षणांबाबत पालकांनी जागरुक राहणे आणि लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार असल्याचे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांनी स्पष्ट केले. गोवरनंतर मुलांमधील प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम दिसून येतात, त्यामुळे गोवर बरा झाल्यानंतरही मुलांमध्ये दिसणारी लक्षणे काळजीपूर्वक हाताळली जाणे आवश्यक असल्याचा इशाराही डॉ. आगरखेडकर यांनी यावेळी दिला.

करोनाकाळात मुलांच्या नियमित लसीकरणाचे प्रमाण

९५ टक्क्यांवरून सुमारे २९ टक्क्यांपर्यंत खाली आले. गोवरचे लसीकरणही याला अपवाद नाही. त्याचा स्वाभाविक परिणाम गोवर उद्रेकाच्या निमित्ताने दिसत आहे.

डॉ. शरद आगरखेडकर, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ