गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका, मेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वाहतूक पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी लोखंडी कठडे (बॅरिकेडींग) उभे करण्यात येणार आहेत. विद्यापीठ चौकाकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मार्गिका (लेन) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. आचार्य आनंदऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) गेल्या काही दिवसांपासून कोंडी होत आहे. या भागातील कोंडी सोडविण्यासाठी महापालिका, मेट्रो, वाहतूक पोलीस, पीएमआरडीएकडून पाहणी करण्यात आली. पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत मेट्रो, पीएमआरडीकडून अतिरिक्त बॅरिकेडींग करण्यात येणार आहे. विद्यापीठ चौकाकडून शिवाजीनगरकडे, तसेच शिवाजीनगरकडून विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मार्गिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

हेही वाचा – “कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी”; चंद्रशेखर बावनकुळेंची सर्वपक्षीयांना विनंती

मेट्रोच्या पुढील टप्प्याचे काम सुरू होणार असून पुणे विद्यापीठ चौकातील ११ मीटरपर्यंचा रस्ता मेट्रोच्या कामासाठी वापरला जाणार आहे. त्यासाठी मेट्रोकडून अतिरिक्त बॅरीकेडींग करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, तसेच अन्य रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

बाणेर रस्ता, औंध रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे येणारी वाहने विना सिग्नलशिवाय शिवाजीनगरकडे डाव्या मार्गिकेकडे नेण्यात येणार आहे. विद्यापीठ चौकात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी यापूर्वी काॅसमाॅस बँकेजवळ वळण (यू टर्न) उपलब्ध करून देण्यात आले होते. तेथील वळण बंद करून पूर्वीप्रमाणेच सेनापती बापट रस्ता चौकातून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्ता (चतु:शृंगी मंदिर) येथून विद्यापीठ चौकाकडे येणारी सर्व वाहने सेनापती बापट रस्ता चौकातून डावीकडे वळून सरळ पाषाण रस्त्याकडे वळविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी मेट्रोकडून सेनापती बापट रस्ता चौक, पाषाण रस्ता असे बॅरीकेडिंग करण्यात येणार आहे.

गणेशखिंड रस्त्याने विद्यापीठ चौकातून औंधकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे – गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ चौक, चतु:शृंगी पोलीस ठाणे, केंद्रीय विद्यालय, कस्तुरबा गांधी वसाहत, पाषाण रस्ता, सिंहगड गेट (पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय) येथून उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जाता येईल.

हेही वाचा – पुणे: कसबा, चिंचवड मतदारसंघासाठी मतदान केंद्रे निश्चित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता चौकातून उजवीकडे वळून सरळ औंधकडे जाता येईल. गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्त्यावरून औंधकडे जाण्यासाठी पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता चौकातून उजवीकडे वळून सर्जा हाॅटेल चौकातून आयटीआय रस्त्याने परिहार चौकाकडून इच्छितस्थळी जाता येईल. पिंपरी-चिंचवडकडून येणाऱ्या वाहनांनी गणेशखिंड रस्त्याचा वापर न करता ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून स्पायसर काॅलेज रस्ता, आंबेडकर चौक, साई चौक, खडकी रेल्वे स्थानक भुयारी मार्ग, डावीकडे वळून चर्च चौक, जुना मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करावा.

पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, मुंढवा या परिसरातून औंधकडे जाणाऱ्या वाहनांनी अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, जुना मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करून खडकी रेल्वे स्थानक भुयारी मार्ग, आंबेडकर, चौक, स्पायसर कॉलेज रस्ता, ब्रेमेन चौकातून औंधकडे जावे.