पुणे : पुणे शहरातील शनिवारवाड्यामध्ये चार दिवसांपूर्वी काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपाच्या नेत्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा परिसरात आंदोलन केले. संबंधित महिलांवर कारवाई करावी, तसेच शनिवारवाडा परिसरातील मजार काढून टाकण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. आंदोलनाला २४ तास होत नाहीत तोवर अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनाबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारवाडा परिसरात काल आंदोलन केले.

मेधा कुलकर्णी आणि रूपाली पाटील ठोंबरे यांच्या आंदोलनाबाबत शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना विचारण्यात आले. ते म्हणाले की, पुणे महानगरपालिकेमध्ये मी आणि मेधा कुलकर्णी दोघांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला त्यांच्या कामाची पद्धत माहीत आहे; पण आता मेधा कुलकर्णी या खासदार असून, त्याप्रमाणे त्यांनी काम केले पाहिजे. तसेच मेधा कुलकर्णी या कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. त्या भागासह पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. जैन समाजाची कोट्यवधी रुपयांची जमीन तुमच्या पक्षातील एका नेत्याने गहाण ठेवण्याचे काम केले. त्यासह अनेक समस्यांना पुणे शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ते प्रश्न सोडवले पाहिजेत आणि त्यावरदेखील मेधा कुलकर्णी यांनी बोलले पाहिजे; पण त्यावर मेधा कुलकर्णी बोलत नाहीत.

आज मी मेधा कुलकर्णी यांना काही प्रश्न विचारू इच्छितो की, आपण राज्यसभा खासदार झाल्यापासून पुण्यामध्ये नव्याने प्रकल्प आणण्यासाठी किती प्रयत्न केले. गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पोलीस आयुक्तांची किती वेळा भेट घेतली? पण, या गोष्टी त्या लक्षात घेत नाहीत. नवरात्रामध्ये कोथरूडमधील दांडियाचा कार्यक्रम बंद पाडला आणि आता शनिवारवाडा परिसरामध्ये आंदोलन केले. हे योग्य नसून मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभा खासदार पदाची शपथ घेतली आहे आणि त्याचा विसर त्यांना पडल्याचे दिसून येत आहे. खासदार म्हणून मेधा कुलकर्णी यांना या गोष्टी शोभत नाहीत आणि त्यांनी लुटुपुटूची लढाई करता कामा नये. पुणे शहरासाठी त्यांनी एक व्हिजन ठेवले पाहिजे, असा सल्ला रवींद्र धंगेकर यांनी दिला.

रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबतही मी सभागृहात काम केले आहे. त्यांनीही काल आंदोलन केले आहे; पण मी मेधा कुलकर्णी आणि रूपाली पाटील ठोंबरे या दोघांच्याही आंदोलनाचे समर्थन करीत नाही. त्या दोघांनी एकत्र बसून आपण समाजासाठी काय केले पाहिजे याबाबतचा विचार केला पाहिजे, असा सल्लादेखील धंगेकर यांनी दिला.