पिंपरी- चिंचवड: पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात उद्या (०४ नोव्हेंबर) रोजी मुंबईत मंत्रालय येथे बैठक पार पडणार आहे. ही बैठक उद्या सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या दहा दिवसांमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला. पिंपरखेड येथील घटनेनंतर ग्रामस्त संतप्त झाले होते.

घराजवळ खेळत असलेल्या १३ वर्षीय रोहनवर दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले आहे. घटनेनंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय पेटवून दिलं होतं. पुणे – नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता. अखेर याप्रकरणी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि परिसरातील बिबट्यांच्या हल्ल्याप्रकरणी दाखल घेऊन मंत्रालयात बैठकीचे नियोजन करण्यात आलं आहे.

बैठकीला स्थानिक माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, दादाराव केचे, शरद सोनवणे, हेमंत ओगले, अतुल बेनके, वसंतराव जाधव, देवदत्त निकम, सत्यजित शेरकर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान प्रमुख वन संरक्षक यांच्या उपस्थित बैठक पार पडणार आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांविषयी ठोस उपाययोजना करण्यात येईल अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.