पिंपरी- चिंचवड: गुंडाविरोधी पथकाने रावण टोळीतील सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींकडून चार पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे आणि एक वापरलेल काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे. अनिकेत अशोक बाराथे, अश्विन सुधीर गायकवाड, यशपाल सिंग अरविंद सिंग देवडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

चिखली येथील पाटील नगरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीतील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या गुंडाविरोधी पथकाने नुकत्याच आवळल्या. पैकी एकाकडे एक पिस्तुल आढळले होते. त्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांचे पथक करत होते. अखेर आरोपींना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली.

आरोपींकडून चार पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे आणि वापरण्यात आलेलं काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांच्या पथकाने केली आहे.