पुणे : पुणे शहरातील मध्यवस्तीतील गणेश मंडळांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, पुणे मेट्रोने गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी विशेष सूचना जाहीर केल्या आहेत. मेट्रो गाड्या आणि स्थानकांतील अतिरिक्त गर्दी आणि त्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी महामेट्रोने हे पाऊल उचलले आहे.
पुणे मेट्रोची स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ ही स्थानके आता प्रवासी सेवेसाठी पूर्णपणे कार्यान्वित झाली आहेत. सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या २ लाख १५ हजार इतकी असून, गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या ५ लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. यामुळे पुणे शहराच्या मध्यवस्तीत लक्षणीय गर्दी होण्याची शक्यता आहे. गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आणि दैनंदिन प्रवाशांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, पुणे मेट्रोने खालील सूचना दिल्या आहेत:
पिंपरी चिंचवड मनपा स्थानक ते स्वारगेट स्थानक (मार्गिका १) या मार्गावरून येणाऱ्या भाविकांनी गणेश दर्शनासाठी कसबा पेठ या स्थानकाचा वापर करावा आणि येथून पायी प्रवास करून जवळच्या गणपतींचे दर्शन घेण्याचा आनंद घ्यावा.
वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गावरून येणाऱ्या भाविकांनी दर्शनासाठी पुणे महानगरपालिका स्थानक, छत्रपती संभाजी उद्यान स्थानक किंवा डेक्कन जिमखाना स्थानक येथे उतरून पुढे गणेश दर्शनासाठी चालत जावे.
पुणे मेट्रोकडून मध्यवस्तीत असणाऱ्या मंडई मेट्रो स्थानकात गर्दी होण्याची शक्यता असल्याने या स्थानकात उतरणे टाळावे, असे विशेष आवाहन करण्यात येत आहे. यामुळे स्थानकांवरील गर्दीचे नियोजन करणे शक्य होईल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा पुरवता येतील. तसेच तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी डिजिटल तिकीट, व्हाट्स अँप तिकीट किंवा पुणे मेट्रोच्या एक पुणे कार्ड च्या वापरावर भर द्यावा.
वृद्ध, महिला आणि गरजू व्यक्तींना लिफ्ट वापरासाठी प्राधान्य द्यावे. एस्केलेटर किना जिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा. स्थानकांच्या प्रवेश द्वारापाशी आणि बाहेर पडताना रांगेने आत किंवा बाहेर जावे. त्या भागात गर्दी करणे टाळावे.
सर्व भाविक आणि प्रवाशांनी पुणे मेट्रो, पोलीस, आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाला त्यांनी दिलेल्या सूचना पाळून सहकार्य करावे आणि आपला गणेशोत्सवातील प्रवास सुरक्षित व आनंददायी करावा, अशी विनंती पुणे मेट्रोने केली आहे.