MHT CET Results 2024 Passing Percentage Topper List : अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या राज्य समाइक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला. त्यात राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत.

सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमएचटी सीईटी परीक्षा २२ एप्रिल ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली. राज्यभरातील १५९ केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यातील १६ परीक्षा केंद्रे राज्याबाहेरील होती. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यचा (जेईई मेन्स) निकाल या पूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लागले होते. सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७ लाख २५ हजार ५२ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीए) गटासाठी ३ लाख १४ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ९५ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी नोंदणी केलेल्या ४ लाख १० हजार ३७७ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ९५ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.

हेही वाचा – ससूनचे कामकाज ‘पारदर्शक’ होणार? कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे पाऊल; अनेक बदल प्रस्तावित

हेही वाचा – पुरंदर विमानतळ नेमके कोणत्या टप्प्यावर? केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी दिलं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीसीबी आणि पीसीएम गटातील मिळून एकूण ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. खुल्या प्रवर्गातील १८ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइलसह प्रथम क्रमांक मिळवला. ओबीसी प्रवर्गात शंभर पर्सेंटाइलसह आठ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अनुसूचित जाती प्रवर्गात मुंबईच्या परेश क्षेत्री, नागपूर येथील सना वानखेडे, अनुसूचित जमाती प्रवर्गात अकोला येथील सृजन अत्राम, रांची येथील सुयांश चौहान, विमुक्त जाती प्रवर्गात नाशिक येथील रिहान इनामदार, रांची येथील मंथन जाधव, भटक्या जमाती (ब) प्रवर्गात कोल्हापूर येथील सलोनी कराळे, पुणे येथील देवेश मोरे, भटक्या जमाती (क) प्रवर्गात ओम गोचाडे, वर्धा येथील प्रणव गावंड, भटक्या जमाती (ड) प्रवर्गात वर्धा येथील आराध्या सानप, जयपूर येथील समृद्धी ओंबासे अग्रस्थानी आहेत. एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.