दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : कोरोनापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्यात जवळपास ठप्प आहे. दूध पावडर, बटरचे साठे पडून आहेत. अन्य राज्यांतून आणि डेअरींकडून असलेली मागणीही ठप्प आहे. प्रक्रिया प्रकल्पांकडून दुधाला मागणी नसल्याच्या या काळात दूध उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होऊन दूधदर ढासळले आहेत.

गोवर्धन डेअरीचे प्रमुख प्रीतम शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या टाळेबंदीपासून राज्यातून दूध पावडर, केसीन, बटर आणि चीज या दुग्धजन्य पदार्थांची निर्यात विस्कळीत झाली आहे. राज्यभरातील दूध प्रक्रिया प्रकल्पांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे साठे पडून आहेत. त्यामुळे प्रक्रियादारांकडून दुधाला असलेली मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्र दूध उत्पादनातील आघाडीवरील राज्य असल्यामुळे केरळ दूध फेडरेशन, बिहार दूध फेडरेशन, दिल्ली या राज्यांतून आणि मदर डेअरीसारख्या मोठ्या प्रक्रियादारांकडून दुधाला मागणी असते. पण, आता देशाच्या त्या त्या भागात अपेक्षित दूधउत्पादन होत असल्यामुळे राज्यातील दुधाला असलेली मागणीही ठप्प झाली आहे. दुधाला मागणी कमी असण्याच्या या काळात राज्यातील दूध उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण होऊन दुधाचे दर कोसळले आहेत. दरम्यान, दुग्धजन्य पदार्थांची निर्यात विस्कळीत असल्याच्या स्थितीला चितळे डेअरीचे संचालक श्रीपाद चितळे यांनीही दुजोरा दिला आहे.

आणखी वाचा-राज्यात दोन दिवस पाऊस? हवामान विभागाचा अंदाज

गाईच्या दुधाला २६ ते ३२ रुपये दर

राज्य सरकारने गाईचे दूध ३४ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा आदेश खासगी आणि सहकारी दूध संघांना दिला आहे. तरीही राज्यात सर्रास गाईच्या दुधाची खरेदी २६ ते ३२ रुपये प्रतिलिटर दराने सुरू आहे. राज्यात दैनंदिन सरासरी एक कोटी ९० लाख लिटर दूधउत्पादन होते. त्यात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होऊन दूधसंकलन दोन कोटी १५ लाख लिटरवर गेले आहे. दुधाला मागणी नसण्याच्या काळात अतिरिक्त दूध उत्पादनामुळे गाईच्या दुधाचे दर कोसळले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्यातीला, शेतकऱ्यांना अनुदान हाच मार्ग

कोरोनापूर्वी दूधपावडर निर्यातीला राज्य सरकारने अनुदान दिले होते. त्यामुळे राज्यातून दूध पावडरची निर्यात झाली होती. अनुदान बंद झाल्यापासून निर्यातही बंद आहे. ही निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी निर्यात अनुदानाची गरज आहे. तसेच दूधउत्पादक शेतकऱ्यांना थेट प्रतिलिटर अनुदान देण्याची गरज आहे. या दोन मार्गांशिवाय दूधदराचा गंभीर प्रश्न सुटणे शक्य नाही. एकच दूधसंघ खरेदीची स्पर्धा असलेल्या ठिकाणी ३२ रुपयांनी आणि स्पर्धा नसलेल्या ठिकाणी २६ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी करतो आहे. तसेच दूध प्रक्रियादारांमधील अघोषित व्यावसायिक स्पर्धेमुळेही दूधदराचा प्रश्न गंभीर झाला आहे, असे कुतवळ फूड्स प्रा. लि.चे प्रमुख प्रकाश कुतवळ यांनी म्हटले आहे.