पुणे : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) राज्याच्या घसरणीबाबत सर्व स्तरांतून झालेल्या टीकेची उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन घसरणीबाबत झाडाझडती घेतली. घसरणीच्या कारणांचे स्वयंमूल्यमापन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच एनआयआरएफ क्रमवारी जाहीर केली. त्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाची मोठी घसरण झाली. तसेच राज्यातील शासकीय विद्यापीठांची या क्रमवारीतील कामगिरी समाधानकारक झालेली नाही. या घसरणीमागे विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा कारणीभूत असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंसह बैठक घेतली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ. प्रमोद नाईक उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी एनआयआरएफ क्रमवारीतील घसरण होण्याची कारणे जाणून घेतली. तसेच त्या बाबत स्वयंमूल्यमापन करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठातील प्राध्यापक भरती, संशोधनात वाढ करणे, तसेच जास्तीच्या जागा निर्माण करणे, विद्यापीठांना निधी देण्याबाबत काय करता येईल, या बाबतही चर्चा झाली.
एनआयआरएफ क्रमवारीतील विद्यापीठांच्या कामगिरीबाबत झालेल्या बैठकीत क्रमवारीतील अन्य निकषांवर विद्यापीठांना प्रयत्नपूर्वक काम करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्याबाबत दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठीच्या समन्वयाची जबाबदारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ‘महासार्क’कडे देण्यात आली आहे.डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण संचालक
नव्या महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी बैठक
राज्यात नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण संस्थांना https://htedu.maharashtra.gov.in/NCPS/ या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.