पुणे : ‘माझ्यासारखा जो दोनदा भाजपचा प्रदेशाध्यक्ष होता, ज्याच्याकडे आठ-आठ खाती होती, त्यालाही आज सांगता येणार नाही, की महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण असेल. याचा अर्थ जे निर्णय करणार आहेत, त्यांनाही आज हे माहीत नाही. २०१९ ला झालेले राजकीय स्थित्यंतर राजकीय नेत्यांना धडा देऊन गेले, की तुम्ही ठरविण्याने काहीच होत नसते,’ असे विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात केले.

‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही थेट भाष्य केले नाही. राजकारणात आता एक अधिक एक अकरा, एकशे अकरा किंवा शून्यही होऊ शकते, असा धडा २०१९ नंतर राजकीय नेत्यांना मिळाला असल्याचे ते म्हणाले. ‘२०१९ मध्ये महायुतीचे १६१ आमदार आणि २९ अपक्षांचा पाठिंबा असूनही सरकार आले नाही, हे कोणत्या तर्कात बसते? किंवा ज्यांच्याकडे ५६ जागा आहेत, त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्रित आमदार त्यांच्यापेक्षा जास्त असूनही मुख्यमंत्रिपद दिले गेले. आम्ही बिहारमध्ये ४२ आमदार असलेले नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे याचा अंदाज लावणेच अशक्य आहे. एक अधिक एक दोनचे राजकारण केव्हाच बदलले आहे.’

हेही वाचा >>> ‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महायुतीला १६० जागा’ ‘लोकसभा निवडणुकीतील निकालामध्ये भाजपची पिछेहाट झाली, असे म्हणता येणार नाही. महायुतीला १७ जागा मिळाल्या. पण, जवळपास १० जागा अवघ्या काही मतांनी गेल्या. लोकसभा निवडणुकीतील चुका आणि उणिवा लक्षात आल्या आहेत. अतिआत्मविश्वासामुळे झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत टाळल्या जातील. काय बोलावे आणि काय बोलू नये, याबाबतही वरिष्ठ पातळीवरून सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महायुतीला किमान १६० जागा मिळतील,’ असा दावा पाटील यांनी केला.