पुणे : ‘संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली आहे. त्यात कोणाकोणाला निधी देणार, हा प्रश्नच आहे. माझा ‘पीएचडी’ करण्याला विरोध नाही. मात्र, ही संख्या किती असावी, हा महत्त्वाचा विषय आहे,’ असे विधान जलसंपदामंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केले. ‘यापूर्वीही विद्यार्थी ‘पीएचडी’ करत होते. तेव्हा या संस्था कुठे होत्या. मला वाटते की, ‘पीएचडी’ची संख्या किती ठेवायची याचा विचार करायला हवा,’ असेही विखे पाटील म्हणाले.

‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’ या संस्थांच्या संशोधन अधिवृत्तीची जाहिरात न आल्याने पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘सारथी’कडून कृषी विद्यापीठातील आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी अधिछात्रवृत्ती बंद करण्यात आली आहे. सारथी संस्थेत आढावा बैठकीसाठी आलेल्या विखे पाटील यांच्याकडे त्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारणा केली. त्यावेळी ते बोलत होते. ‘संशोधन अधिवृत्तीच्या जाहिरातीसंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाकडे प्रस्तावित असून, त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. मागच्या जाहिरातीप्रमाणे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार अधिवृत्ती देण्यात येईल,’ असे आश्वासनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

राज्यातील चारही कृषि विद्यापीठात आचार्य पदवीचे शिक्षण घेणाऱ्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना सन २०१८-१९ पासून सरसकट नियमितपणे ‘सारथी’कडून अधिछात्रवृत्ती देण्यात येते. त्यामुळे मराठा आणि खुल्या प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांना आचार्य पदवीच्या शिक्षणा दरम्यान दर्जेदार संशोधन करण्यास मदत मिळते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, वस्तीगृह शुल्क, पुस्तके, स्टेशनरी खर्च या गरजा भागविणे शक्य होते. हे विद्यार्थी पुर्णवेळ विद्यापीठामध्ये निवासी असतात. यांना कोणत्याही प्रकारची बाहेर नोकरी करण्याची परवानगी नाही. मात्र, २०२३-२४ पासून अधिछात्रवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्याचा संशोधनावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी या वेळी केला.

दरम्यान, संशोधक विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’, तर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’ आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) ‘महात्मा ज्योतिबा संशोधन अधिछात्रवृत्ती’ देण्यात येते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून जाहिरातीअभावी पदरमोड करून संशोधन करण्याची वेळ आल्याने ‘बार्टी,’ ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ या संस्थांच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सोमवारी (१५ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून मोर्चाला सुरवात झाली. त्यानंतर, कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय येथून नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीचे दयानंद पवार, गणेश जानकर, विश्वजित काळे, आशा देशमाने आंदोलनस्थळी उपस्थित होते. सर्व संस्थांच्या जाहिराती तत्काळ काढाव्यात, नोंदणी दिनांकापासून सरसकट अधिवृत्ती जाहीर करावी, संपूर्ण निवड प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करावी, फेलोशिप वेळेवर देण्यात यावी आदी मागण्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आल्या.