पुणे: ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्ड क्रमांक १६ मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी झाला. मात्र अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. पण या घटनेत राज्य सरकार मधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. अशी माहिती काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील नेमका मंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्ड क्रमांक १६ मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला आठ दिवस झाले आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ससून रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. त्या सर्व घडामोडी दरम्यान कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन अमली पदार्थ तस्कर ललित पाटील या आरोपीला नेमका कोणता आजार झाला होता. नऊ महिने कोणत्या आजारावर उपचार सुरू होते. रूग्णालयात एवढी सुरक्षा यंत्रणा असताना देखील आरोपी कसा पळून गेला.या सर्व प्रश्नाचा भडीमार केला. या प्रश्नांना अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांना कोणत्याही प्रकारची समाधानकारक उत्तर देण्यात आली आहे. त्यानंतर वॉर्ड क्रमांक १६ ची आमदार रविंद्र धंगेकर यांनी पाहणी केली.

आणखी वाचा-पुणे : बुधवार पेठेत पुन्हा कारवाई; सात बांगलादेशी महिलांना पकडले

यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत आमदार रविंद्र धंगेकर यांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी देखील दोन तीन दिवस रूग्णालयात अ‍ॅडमिट होतो. माझ्यावर उपचार झाल्यावर डॉक्टरांनी उपचार केल्यावर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र ससून रुग्णालयामधील वॉर्ड क्रमांक १६ मधील अमली पदार्थ तस्कर ललित पाटील या आरोपीवर तब्बल नऊ महिने उपचार सुरू होते. या आरोपीला नेमका कोणता आजार झाला होता. एखाद्या व्यक्तीला किती ही गंभीर आजार असला तरी काही दिवसांनी डिस्चार्ज दिला जातो. त्यामुळे ललित पाटील प्रकरणामध्ये कोट्यवधी रूपयांच अर्थकारण झालं असणार आणि आरोपी पळून गेला आहे. त्यामुळे या आरोपीवर उपचार करणार्‍या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आणखी वाचा-पुणे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर, आमदार धंगेकर यांना डावलले

तसेच ते पुढे म्हणाले की, ससून रुग्णालयामधील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये १० ते १२ आरोपी उपचार घेत होते. पण ललित पाटील पळून गेल्यावर अनेक आरोपींना येरवडा कारागृहात सोडण्यात आले आहे. त्यामुळे खरच आरोपीवर उपचार सुरू होते का? हा प्रश्न निर्माण होतो. तसेच शिंदे गटातील एका मंत्र्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, कोणत्या रुग्णाला, कोणता आजार झाला आहे. याबाबत आम्ही नियमानुसार माहिती देऊ शकत नाही. तसेच हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने अधिक माहिती देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.