पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरातील झोपडपट्टीत शनिवारी सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमध्ये पडून वाहून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा मृतदेह कसबा पंपिंग स्टेशनमध्ये सापडला आहे. सदाशिव पेठेतील अंबिल ओढा झोपडपट्टी परिसरातील एका सांडपाणी वाहून जाणाऱ्या चेंबरमध्ये गणेश किशोर चांदणे हा मुलगा खेळता खेळता पडला. याठिकाणी असणाऱ्या नाल्याच्या भिंतीला भगदाड पडले होते.

तेथून या मुलाला नाल्यातून वाहत जाणारा चेंडू दिसला. चेंडू बाहेर काढण्यासाठी मुलाने नाल्याच्या काठावर उभे राहून त्याठिकाणी असणाऱ्या बांबूच्या सहाय्याने चेंडू बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नेमक्या याचवेळी नाल्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याच्या लोंढ्यामुळे बांबू काहीसा हालला आणि त्यामुळे मुलाचाही तोल जाऊन तो नाल्यात पडला. त्यानंतर तो मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला आणि तीन ते चार फुट अंतरावर असणाऱ्या चेंबरमध्ये फेकला गेला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले असून त्यांनी शोधकार्य सुरू केले. या नाल्यातील सांडपाणी मुळा आणि मुठा नदीत सोडले जाते. अंबिल ओढा झोपडपट्टी ही सदाशिव पेठेत आहे. या ओढ्याजवळ पुरग्रस्त चाळ, महापालिका सेवकांची चाळ आहे. त्याचबरोबर दांडेकर पूल झोपडपट्टी आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक मुले इथे खेळण्यासाठी येतात. कालपासून मुलाचा शोध घेणे सुरू होते. आज सकाळी कसबा पंपिंग स्टेशन येथे त्या मुलाचा मृतदेह वाहत आला.