पुणे : उत्तम दर्जाची आणि सुरक्षित इंटरनेट सेवा देण्यासाठी राज्य शासनाने ‘डक्ट पॉलिसी’ सक्तीची करावी, अशी मागणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
शहरात नांदेड सिटीकडून येताना अचानक तुटलेली केबल दुचाकीस्वाराच्या मानेला घासून अपघात झाला. शहरातील बहुतांश रस्त्यांवर इंटरनेट आणि केबल टीव्हीसाठी अनधिकृतपणे केबल टाकण्यात आल्या आहेत. या केबल अस्ताव्यस्त पसरल्या असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे. तसेच, केबल तुटण्याच्या शक्यतेने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने सन २०१८ मध्ये ‘डक्ट पॉलिसी’ला मंजुरी दिली होती. पण, त्याची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. महापालिकेकडून भूमिगत केबल टाकण्याकरिता खासगी इंटरनेट कंपन्यांकडून प्रति रनिंग मीटर एक हजार २०० रुपये शुल्क आकारले जाते.
हे शुल्क टाळण्यासाठी खासगी कंपन्या ओव्हरहेड केबल्स टाकून सुविधा पुरवितात. हे शुल्क जास्त असून, त्याबद्दल फेरविचार होणे आवश्यक आहे, असेही शिरोळे यांनी स्पष्ट केले.