पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) फेरबदल होणार, या केवळ कल्पनेने गेल्या आठवडाभरापासून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आल्यानंतर याबाबतचे आदेश देणार असल्याची पदाधिकाऱ्यांनी अटकळ बांधली होती. मात्र, ते आले, अर्धा तास ‘कोअर कमिटी’शी बोलले आणि महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी एक महिन्याने पुन्हा पुण्यात येऊन बैठक घेतो, असे सांगून निघून गेले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा उत्साह पुन्हा माळवला असून, आता ‘मनसे’चे ‘ इंजिन’ चालण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. हा दौरा खासगी भेटीगाठीचा असला, तरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पक्षांतर्गत काही फेरबदलाचे संकेत देण्यात आले होते. काही पदाधिकाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी, तर काही नव्या नियुक्त्या करून आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचा पदाधिकाऱ्यांचा अंदाज होता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानुसार राज ठाकरे यांनी सोमवारी ‘कोअर कमिटी’ची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेताना आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचा आदेश दिला. शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष आणि राजदूत यांनी निवडणुकीच्यादृष्टीने पक्षबांधणीसाठी कामाला सुरूवात करण्याची सूचना केली. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी पुढील महिन्यात बैठक घेऊन नियोजन करण्याचे आश्वासन देऊन बैठक आटोपती घेतली. त्यामुळे अतिरिक्त जबाबदारी, नवीन पदाधिकारी आणि महापालिका निवडणुकीसाठी पूर्वतयारी हे विषय मागे पडून इच्छुकांचा भ्रमनिसार झाला.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपने पक्षांतर्गत बदल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आज वर्धापन दिनाच्यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन करणार आहेत. काँग्रेसमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचे निरीक्षक, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे बैठक घेऊन फेरबदल करणार आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना महानगरप्रमुखपदी निवडून निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्ष शांत असताना, राज ठाकरे यांनी एक महिन्याने महापालिका निवडणुकांसाठी नियोजन करण्याचे ठरवल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, मनसेची पुणे शहरातील ताकद ही क्षीण होत चालली आहे. पक्षस्थापनेनंतर या पक्षाने २००७ मध्ये लढविलेल्या महापालिका निवडणुकीत ८ नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा कमी कालावधीत मनसेने ताकद दाखवून दिली होती. २०१२ च्या महापालिकेच्या निवडणुकीत २९ नगरसेवक निवडून आल्याने मनसेचा बोलबाला झाला. मात्र, त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागून २०१७ च्या निवडणुकीत अवघे २ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्ष सोडला. या पार्श्वभूमीवर पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी राज ठाकरे हे बैठकीत ठोस भूमिका मांडून निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश देतील, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, महापालिका निवडणुकांच्या नियोजनासाठी पुढील महिन्यात बैठक घेण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केल्याने आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शिवसेनेबाबतही भाष्य टाळले
राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना ‘कोअर कमिटी’च्या बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून योग्य तो संदेश कार्यकर्त्यांना दिला जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, बैठकीत राज ठाकरे यांनी या विषयावर कोणतेही भाष्य करणे टाळले. त्यामुळे ‘कोअर कमिटी’तील पदाधिकारीच संभ्रमावस्था पडण्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.