खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडण्याच्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निर्णय़ाचे संतप्त प्रतिसाद पुणे शहरात उमटू लागले आहेत. या निर्णयाचा विरोध करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी जलसंपदा विभागाच्या पुणे क्षेत्राचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्या कार्यालयाची मंगळवारी सकाळी तोडफोड केली. कार्यालयातील काचांची आणि लाकडी फर्निचरची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे.
दौंडला पिण्यासाठी अर्धा टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी खडकवासला धरणातून सोडण्याची तयारी पालिकेतील गटनेत्यांनी दाखविली असतानाही या सर्वांना झुगारून लावत पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंडसह इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय सोमवारी घेतला. इंदापूरला कालव्यातून पाणी सोडूनही ते पोहोचणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे असतानाही इंदापूरला पाणी सोडण्याचा खटाटोप केला जात आहे. पालकमंत्र्यांच्या या अट्टाहासामुळे आठ महिन्यांपासून कपात करून वाचविलेल्या पाण्यावर गदा येणार असून, पुणेकरांना आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दौंड व इंदापूरसाठी अर्धा ते पाऊण टीएमसी पाणी सोडण्याबाबतचे नियोजन कालवा समितीच्या बैठकीत करण्यात आले होते. त्याला पुणेकरांनी कडाडून विरोध केला होता. दौंडला पिण्यासाठीच पाणी हवे असेल, तर कालव्याऐवजी टँकर किंवा रेल्वेने पाणी पुरविण्याचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. पुण्यात आणखी पाण्याची कपात न करता दौंडला पाणी सोडण्यात येईल, असे बापट यांनी जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्ष निर्णय घेताना बापट यांनी कालवा समितीत ठरलेले नियोजनही बदलले व दौंडसह इंदापूरलाही नियोजनापेक्षा जास्त पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना होणारा विरोध लक्षात घेता पालिकेला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मनसेकडून ही तोडफोड करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2016 रोजी प्रकाशित
पुण्यात पाणी ‘पेटले’ : मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड, बापटांच्या निर्णयाला कडाडून विरोध
या घटनेनंतर जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 03-05-2016 at 12:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns workers ransacked sinchan office in pune