पिंपरी महापालिकेतील तीनही अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजात आयुक्त शेखर सिंह यांनी फेरबदल केले आहेत. त्यानुसार, जितेंद्र वाघ यांच्याकडे प्रशासनासह महत्त्वाचे विभाग सोपवण्यात आले आहेत. तर, उल्हास जगताप यांच्याकडे यापूर्वी असलेला सुरक्षा विभाग पुन्हा देण्यात आला आहे.
यापूर्वी विकास ढाकणे यांच्याकडे सर्व महत्त्वाचे विभाग होते. त्यांची बदली झाल्यानंतर स्मिता झगडे यांची त्या जागी नियुक्ती झाली होती. तथापि, आयुक्तांनी झगडे यांना रूजू करून घेतले नाही. अखेर, या जागेवर प्रदीप जांभळे यांची वर्णी लागली. त्यानंतर, आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि काही फेरबदल केले आहेत.

हेही वाचा- मराठी संगीतकर्मींच्या सांगितिक लढ्यामुळेच ‘वंदे मातरम‘ला राष्ट्रगीताचा दर्जा ; मिलिंद सबनीस यांचे मत

कोणाकडे कोणते विभाग?

अतिरिक्त आयुक्त (१) जितेंद्र वाघ यांच्याकडे प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण, पशुवैद्यकीय, क्रीडा, स्थापत्य, वैद्यकीय, आरोग्य, आकाशचिन्ह व परवाना, पर्यावरण, भूमी-जिंदगी, यशवंतराव चव्हाण रूग्णालय आदी विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त (२) प्रदीप जांभळे यांच्याकडे उद्यान, अग्नीशामक, शिक्षण, कायदा, कामगार कल्याण, अतिकमण, स्थानिक संस्था कर आदी विभाग देण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त (३) उल्हास जगताप यांच्याकडे सुरक्षा, समाजविकास, कार्यशाळा, नगरसचिव, माहिती व जनसंपर्क, नागरी सुविधा केंद्र, झोपडपट्टी पुर्नवसन, आयटीआय, अभिलेख कक्ष, सर्व क्षेत्रीय कार्यालये, वाचनालये, प्रेक्षागृहे, आपत्ती व्यवस्थापन आदी विभाग देण्यात आले आहेत.

हेही वाचा- पुणे : सदनिकांच्या विक्री करारनाम्यांच्या नोंदी आता सुलभ ; दोन वर्षांत सात हजार सदनिकांची नोंद

अतिरिक्त आयुक्तांना विभागांनुसार संपूर्ण कामकाज सोपवले

अतिरिक्त आयुक्तांना विभागांनुसार संपूर्ण कामकाज सोपवण्यात आले आहे. प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर त्यांनी करायचा आहे. नमूद विभागांचे नियंत्रण अतिरिक्त आयुक्तांकडे असणार आहे. त्यांच्या अधिकारात बदल करण्याचे तथा रद्द करण्याचे हक्क राखून ठेवले असल्याची माहिती पिंपरी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.