पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी माेनिका ठाकुर यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचा आदेश महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी सोमवारी जारी केला. दरम्यान, महापालिकेत तिन्ही अतिरिक्त आयुक्त कार्यरत असताना ठाकुर यांचा आदेश आल्याने प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे मंजूर आहेत. त्यात दोन प्रतिनियुक्तीने आणि एक स्थानिक अधिकाऱ्यांमधील एक अशी विभागणी आहे. राज्य सेवेतील नियोजन विभागातील प्रदीप जांभळे-पाटील, मुख्याधिकारी संवर्गातील विजयकुमार खोराटे कार्यरत आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांसाठी असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदीही राज्य सेवेतील मुख्याधिकारी संवर्गातील तृप्ती सांडभोर कार्यरत आहेत. त्यांपैकी जांभळे-पाटील यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला आहे. मात्र, त्यांच्या बदलीचा अद्याप काेणताही आदेश शासनाकडून आला नाही. तत्पूर्वीच माेनिका ठाकूर यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

जांभळे-पाटील यांची बदली झाली नसताना ठाकूर यांचा आदेश आल्यामुळे प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, ठाकूर यांची महसूल विभागाचा आदेश झाला आहे. अद्याप नगरविकास विभागाचा आदेश झाला नाही. या विभागाचा आदेश स्वतंत्र येईल, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची अपर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांची पदोन्नतीने नागपूरला बदली झाली आहे. त्यांच्याकडे नागपूर विभागातील प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडे करसंकलन आणि निवडणूक विभागाची जबाबदारी होती. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. तसेच, अंतिम प्रभागरचना, मतदारयादीचे कामकाजदेखील त्यांनी सुरू केले होते.