पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा जोर धरलेल्या पावसाने सोमवारी राज्याच्या बहुतांश भागांना झोडपले. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भात काही ठिकाणी एक ते दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आदी जिल्ह्यांत मुसळधारांची शक्यता आहे. गेल्या २४ तासांमध्ये दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळला.

बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेशपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला अरबी समुद्राच्या दिशेने महाराष्ट्र ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती असल्याने मोठय़ा प्रमाणावर बाष्प भूभागाकडे येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

कोकण किनारपट्टीपासून पूर्व विदर्भापर्यंत सध्या कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. विशेष: घाट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, अलिबाग, रत्नागिरी, अमरावती, अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी आदी भागांत पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत दक्षिण कोकण आणि विदर्भात काही भागांत २०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.

पाऊसभान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांत काही भागांत पुढील एक ते दोन दिवस या कालावधीत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, सातारा, औरंगाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.