पाऊस नाही.. अजून नाही.. अजूनही नाही.. महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात गेले काही दिवस तक्रारीचा सूर आहे. आणि तो का नसावा? जून महिना संपला. तरीही पावसाचा जोर नाही. अजून मान्सूनचा पाऊस सक्रिय कसा नाही? कोकण, विदर्भाचा काही भाग सोडला तर महाराष्ट्र कोरडाच आहे. आतापर्यंत पेरण्यांची तयारी झालेली असते. कुठे त्या उरकलेल्या असतात. यंदा चित्र वेगळं आहे. भाताची रोपंसुद्धा नव्यानं वाढवायची वेळ आलीय.
देहू-आळंदीची वारी सुरू झाली. तिथंही पाऊस लांबल्याचा परिणाम दिसला. इंद्रायणीचा घाट नेहमीइतका भरला नव्हता या वेळी. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात तर जुलैच्या दुसऱया आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागेल. काय होणार तोवर? अनेकांना चिंता लागू राहिलीय. मान्सूनबाबत शंकाही उपस्थित केल्या जात आहेत- अरे, काय लावलंय.. दगा देणार की काय या वर्षी?
मान्सून येईपर्यंत, तो येणार का? आणि आता आल्यावर तो दगा देणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत.. यातून आपण किती अधिर आहोत, याचं दर्शन होतं. पण मान्सूनबद्दल म्हणाल तर तो विश्वासू आहे.. अगदी ओल्ड फेथफूल!
हे ठामपणे म्हणण्याला कारण आहे. कारण मान्सून आला नाही, असं कधी झालं नाही. कधी होतही नाही. तो येतो म्हणजे येतोच. त्याच्या वाट्याचा पाऊस देतो. मगच जातो.. हेच तर आपल्या मान्सूनचं वैशिष्ट्य. त्याचं येणं पक्कं असतं आणि पाऊस देणंसुद्धा. हा काळही सर्वसाधारपणे ठरलेला असतो. या सर्वच गोष्टींमध्ये थोडं पुढं-मागं होतं, इतकंच. मान्सूनचा भारताकडं येण्याचा प्रवास तब्बल दीड कोटीवर्षांपासून सुरू आहे. हिमालयाची उंची काही कोटी वर्षांपासून वाढतच आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. ती विशिष्ट पातळीपर्यंत वाढली, तेव्हा मान्सूनच्या निर्मितीला गती आली. तेव्हापासून तो (म्हणजेच मोसमी वारे) भारताकडे येतो आहे, सोबत पावसाला आणतो आहे. हा काळ होता- साधारणत: १.५४ कोटी ते १.३९ कोटी वर्षांपूर्वीचा. गोव्यातील राष्ट्रीय सागरविज्ञान संस्था तसेच, ब्रिटनच्या संशोधकांनी पाचेक वर्षांपूर्वी हे दाखवून दिलं. त्याआधी हा काळ ८० लाख वर्षे इतका समजला जात होता.
मान्सूनचं पाणी देण्याचं प्रमाणही ठरलेलं. त्यात चढ-उतारही असतो. संपूर्ण देशाचा विचार केला, तर कमीत कमी सरासरीच्या ७० टक्के आणि जास्तीत जास्त १२५ टक्के ! मान्सूनचा भारतात येण्याचा, पुढं सरकण्याचा काळही असाच. केरळ- १ जून, महाराष्ट्र- ६/७ जून, दिल्ली- १ जुलै, संपूर्ण भारत व्यापणं- १५ जुलै… या सरासरी तारखा. त्यासुद्धा मागं-पुढं होतात. ही तफावत हे तर मान्सूनचं स्वातंत्र्य. तो निसर्गाचा भाग आहे, मशीनचं उत्पादन नव्हे.. ठरवून दिलेल्या मापानुसार बाहेर पडणारं, दरवर्षी एकसारखं! आता हा चढ-उतारही झेपत नसेल, तर तो आपला दोष. त्याची दूषणं मान्सूनला कशी?
खरं सांगू का? अलीकडं आपल्याला सबुरी उरलीच नाही. क्षणभराचा उशीर चालत नाही आम्हाला. कदाचित सर्वच गोष्टी मुळासकट खाण्याची सवय लागल्यामुळे असेल. शिवाय नियोजनाची बोंब. त्यामुळे आम्हाला जराही थांबणं जमत नाही. आता तर त्यात ‘बकासुरी’ माध्यमांची भर पडलीय. त्यांनी आमची थांबण्याची सवय पार संपवूनच टाकलीय.. पण हे योग्य नाही. जरा इतिहासात डोकवा. निसर्गाच्या सर्वच घटकांमध्ये चढ-उतार आहेत. हे सारं विसरून नुसतंच अधिर बनणं बरं नाही, उपयोगाचंही नाही.. अपयश आपलं अन् पावती मान्सूनच्या नावावर. असं कसं चालेल?
त्याच्याइतकी विश्वासार्हता फारच कमी जणांकडं असते. तीसुद्धा दीड कोटी वर्षांपासून. म्हणूनच त्याला म्हणायचं- ओल्ड फेथफूल, कोणी मानो न मानो!
– अभिजित घोरपडे
abhighorpade@gmail.com