बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळेच राज्यातील संपूर्ण कोकण व्यापण्यापूर्वीच त्याने शुक्रवारी (१२ जून) विदर्भात प्रवेश केला आहे.
दक्षिणेच्या दिशेने मध्य महाराष्ट्रात आणखी प्रगती करीत पुणे जिल्ह्य़ाचा काही भाग आणि मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ापर्यंत त्याने मजल मारली आहे. याच कालावधीत विदर्भासह मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
पोषक हवामानाच्या स्थितीमुळे गुरुवारी (११ जून) मोसमी वाऱ्यांचा प्रवास अरबी समुद्राच्या बाजूनेही वेगाने झाला. परिणामी एकाच दिवसांत कर्नाटकातील काही भाग आणि गोवा राज्य ओलांडून त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला. विदर्भात मोसमी पावसाचे जोरदार आगमन झाले.
अंदाज काय? पुढील ४८ तासांमध्ये मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील सर्वच भागात मोसमी पाऊस प्रवेश करणार आहे. या कालावधीत सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.