पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्ष २०२४चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात राज्यातील अर्चित डोंगरे यांनी देशात तिसरा क्रमांक पटकावला. शक्ती  दुबे यांनी देशात पहिला, तर हर्षिता गोयल यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असून, मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे. राज्यातील ५०हून अधिक उमेदवारांनी या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत.

यूपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकाल जाहीर केला. यूपीएससीतर्फे नागरी सेवा परीक्षा २०२४मधील लेखी परीक्षा सप्टेंबर २०२४मध्ये, तर मुलाखती जानेवारी ते एप्रिल २०२५या कालावधीत घेण्यात आल्या. त्यानंतर शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. नागरी सेवा परीक्षा एकूण १ हजार १२९ पदांसाठी राबवण्यात आली. त्यात भारतीय प्रशासकीय सेवेच्या १८०, भारतीय परराष्ट्र सेवेच्या ५५, भारतीय पोलिस सेवेच्या १४७, केंद्रीय सेवा ‘गट अ’च्या ६०५, तर ‘गट ब’च्या १४२ जागांचा समावेश आहे. त्यातील ५० जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जाहीर केलेल्या निकालातील २४१ उमेदवारांची शिफारस तात्पुरती आहे, तर एका उमेदवाराचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे यूपीएससीने नमूद केले आहे. निकालामध्ये पुण्याच्या अर्चित डोंगरे यांनी देशात तिसरे स्थान पटकावले आहे. त्याशिवाय पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील चार उमेदवारांचा समावेश आहे.

शिवांश जगदे यांनी २६वा, विवेक शिंदे यांनी ९३वा, तेजस्वी देशपांडे यांनी ९९वा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच शिफारस केलेल्या १००९ उमेदवारांमध्ये राज्यातील ५०हून अधिक उमेदवारांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर निकाल आणि शिफारसपात्र उमेदवारांची यादी upsc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.