पुणे : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज-देहू रोड बाह्यवळण रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातल्यानंतर पहिल्या दिवशी (बुधवारी) वाहनचालकांना दिलासा मिळाला. दिवसभर या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली नसून, सुरळीत वाहतूक असल्याचे चित्र होते. वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या काळातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेळेनुसार ट्रक आणि इतर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. वाहतूक पोलिसांच्या नवीन वेळापत्रकानुसार, अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११ या वेळेत साताऱ्याहून मुंबईकडे आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत मुंबईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावरून बंदी घालण्यात आली आहे.

त्यानुसार नवले पूल, मुठा नदी पूल, वारजे पूल, हिंजवडी आणि ताथवडे या महत्त्वाच्या ठिकाणी ही बंदी काटेकोरपणे लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी हलक्या वाहनांना आणि प्रवासी गाड्यांना कात्रज ते किवळे हा प्रवास अवघ्या २२ मिनिटांत पूर्ण करता आला, अशी प्रतिक्रिया काही वाहनचालकांनी दिली. सामान्यतः या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे एक तास वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत होता.

पुणे शहर पोलिस, पिंपरी चिंचवड पोलिस आणि राज्य महामार्ग सुरक्षा पेट्रोल (एचएसपी) यांच्या पथकांना बाह्यवळण मार्गांवर तैनात करण्यात आले होते. जड वाहनांना नियुक्त पार्किंग क्षेत्रात थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. सातारा जिल्हा, खेड-शिवापूर आणि नवीन कात्रज घाट परिसरात ट्रक आणि मल्टी-ॲक्सल वाहने पार्क केली गेली, तर मुंबईकडे जाणारी वाहने उर्से, सोमाटणे आणि जवळपासच्या भागात थांबवण्यात आली.

अवजड वाहनचालकांना या निर्बंधांची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश चालकांनी स्वेच्छेने बायपास सोडला. मात्र, काही वाहने पहिल्या मार्गिकेवर आले, मात्र, त्यांना तैनात कर्मचाऱ्यांनी किवळेच्या दिशेने पुढे पाठविण्यात आले. संध्याकाळी वारजे पुलाजवळ एका ट्रकमध्ये तात्पुरता बिघाड झाल्याने किरकोळ वाहतूक कोंडी झाली, परंतु एकंदरीत वाहतूक व्यवस्थित राहिली. विक्रांत देशमुख, महामार्ग पोलीस अधीक्षक

पोलिसांनी या नियमाची नियमित आणि प्रभावी अंमलबजावणी करावी. आजच्या नवीन बदलामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला. कात्रजवरून हिंजवडीतील कार्यालयात पोहोचण्यासाठी दररोज दीड ते दोन तास लागत होते. आज पाऊण तासात पोहोचता आले. ही बंदी कायम राहावी. मनप्रीत सिंग, चालक