पुणे : नागरिकांच्या पैशातून केलेल्या विकासकामांना कुटुंबीयांची नावे देण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावनांची दखल घेत उद्यानाचे पूर्वीचेच नाव कायम ठेवावे, अशी सूचना माजी सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांना केली होती. त्यावर त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे भिमाले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गिरीश बापट अध्यक्ष असलेल्या नटरंग अकादमी संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबाबतची माहिती बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्यानाच्या नावावरून जो वाद निर्माण झाला आहे, त्याबाबत भूमिका स्पष्ट केली. बापट यांनी केलेल्या या मागणीमुळे भारतीय जनता पक्षामध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सॅलिसबरी पार्क येथील महापालिकेच्या उद्यानाला माजी सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी प्रा. यशवंतराव भिमाले उद्यान असे नाव दिले आहे. नागरिकांच्या करातून महापालिकेने विकसित केलेल्या उद्यानाला वैयक्तिक नाव देण्यास सॅलिसबरी पार्क रेसिडन्स फोरमने विरोध दर्शविला होता. त्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलने सुरू आहेत. या संदर्भात फोरमचे पदाधिकारी माजी मुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले होते. उद्यानाला प्रा. यशवंतराव भिमाले उद्यानाऐवजी सॅलिसबरी पार्क हेच पूर्वीचे नाव द्यावे, अशी फोरमच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.  ‘महापालिकेच्या विकासकामांना कुटुंबीयांची नावे देण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. अशा प्रकारे नावे देणे अयोग्य आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांची भावना लक्षात घेऊन उद्यानाचे नाव पूर्वी प्रमाणे करावे, अशी सूचना श्रीनाथ भिमाले यांना केली होती. मात्र त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या भावनांचा अनादर केला आहे. या संदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे,’ असे बापट यांनी सांगितले.

बापट म्हणाले की, गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ मी लोकप्रतिनिधी म्हणून शहरात कार्यरत आहे. या काळात कुठेही माझ्या कुटुंबातील लोकांची नावे महापालिकेने केलेल्या विकासकामांना मी दिलेली नाहीत. एखाद्या व्यक्तीचे समाजासाठी योगदान असेल, तर त्याची दखल नक्कीच घेतली जावी. मात्र कुटुंबीयांची नावे विकासकामांना देण्याची पद्धत चुकीची आहे.

बापटांच्या मागणीची पक्षात चर्चा

शिस्तप्रिय पक्ष अशी भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भिमाले यांच्यावर कारवाई करावी, ही मागणी पक्षाच्या पद्धतीनुसार त्यांना करता आली असती. मात्र खासदार बापट यांनी माध्यमांद्वारे ही मागणी केल्याचे जाहीर का केले, अशी चर्चा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्दय़ावरूनही खासदार बापट यांनी चार दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. आता कारवाईची जाहीर मागणी केल्यानंतर पक्षात नवा वाद होण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp girish bapat demands action against srinath bhimale on salisbury park garden renaming issue zws
First published on: 26-05-2022 at 00:15 IST