पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या ताथवडेतील पशुसंवर्धन केंद्राच्या ६५ हेक्टर जागेत सेंट्रल पार्क विकसित करावे. ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांनी निवेदन दिले आहे.
खासदार बारणे म्हणाले, ‘ताथवडे परिसर पिंपरी-चिंचवड शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पशुसंवर्धन विभागाची ६५ हेक्टर जागा ब्रिटिश काळापासून आरक्षित आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. चारही बाजूंनी शहराचा विस्तार होत असून मोठ्या गृहनिर्माण संस्था उभारल्या जात आहेत.
गगनचुंबी इमारती होत आहेत. त्यामुळे मोठ्या उद्यानाची आवश्यकता आहे. ताथवडेतील पशुसंवर्धन विभागाच्या ६५ हेक्टर जागेवर सेंट्रल पार्क होणे गरजेचे आहे. उद्यान झाल्यास झाडेही वाचतील. बाजूनेच शहरातून पवना नदी जात आहे. नदीलगत या परिसरात निळी पूररेषा आहे. नदीलगतच्या जागेत सेंट्रल पार्क विकसित केले. तर, त्याचा नागरिकांना लाभ होईल.
शुद्ध हवा मिळेल. बाजूलाच थेरगाव येथे बोट क्लब आहे. त्यामुळे शहरातील नागरिक येथे सकाळ-संध्याकाळी चालणे, फिरण्यासाठी येतील. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी हक्काचे ठिकाण होईल.’