‘या’ संस्थेबाबत घेतला निर्णय

बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदावरून खासदार सुप्रिया सुळे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे

बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे . बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या  खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी होत्या. आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या पत्नी, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या संस्थेच्या सदस्यपदी ज्योती नवनाथ बल्लाळ, डॉ. कीर्ती सतीश पवार, डॉ. सचिन कोकणे, श्रीनिवास वायकर, डॉ. दिलीप लोंढे, अविनाश गोपने, बिरजू मांढरे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

समितीचे नियम आणि अटी

– या समितीचा कालावधी दोन वर्षाचा राहील. परंतु दुसरी नवीन समिती स्थापन होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या समितीचे सदस्य कार्यभार धारण करतील.

 –  समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा तरी बोलविण्यात यावी. अध्यक्षांनी निर्देशित केल्यास, अधिक वेळा बैठक बोलविता येईल.

 – कोणीही सदस्य सतत दोन बैठकीत अनुपस्थित राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्य होईल, परंतु सदस्य योग्य व सबळ कारणांसाठी अनुपस्थित राहिला असल्यास सभासदस्यत्व पुढे चालू ठेवण्यास शासन अनुमती देईल.

 – समितीच्या प्रत्येका बैठकीची आगाऊ सूचना बैठकीच्या दिनांकापासून १० दिवस अगोदर बैठकीच्या कार्यसूचीसह समिती सदस्यांना पाठविण्यात यावी, तसेच संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना समितीच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहण्याचा हक्क राहील व त्या उपस्थितीच्यावेळी त्यांना समितीच्या सदस्यांचे हक्क व दर्जा प्राप्त असेल.

– समितीच्या बैठकीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुबई यांना समितीच्या सदस्य सचिवांनी बैठकीच्या दिनांकापासून एक आठवड्याच्या आत पाठवावा.

– रुग्णालय अभ्यागत समितीच्या विधान मंडळ सदस्यांव्यतिरिक्त अशासकीय सदस्यांना बैठकीच्यावेळी अंमलात असलेल्या नियमांनुसार प्रवास भत्ता देण्यात यावा.

– समितीची बैठक उपस्थित असलेल्या सदस्यांमध्ये चालविली जाईल. बैठकीसाठी गणसंख्येची लागू असणार नाही.

– समितीच्या सदस्यांना आपल्या सूचना/अभिप्राय किंवा विचार रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गास पररपर न कळविता ते संबंधित वैद्यकीय महाविद्यालय/रुग्णालयाचे अधिष्ठाता किंवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांना कळवावे. त्याप्रमाणे सदस्यांना जर एखाद्या कक्षास भेट द्यावयाची असल्यास त्यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिकारी किंवा प्रभारी परिचारीका यांची उपस्थिती आवश्यक आहे.

– समितीसाठी असलेल्या विचारार्थ विषयांपैकी एक विषय जनतेच्या गाहाण्यांचा अभ्यास करणे व रुग्णालय कर्मचा-यांचा वक्तशीरपणा, वर्तणूक आढावा घेणे हा आहे. समिती समोर आलेली गा-हाणी समितीने रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवून गाहाण्यांची चौकशी करून त्याचा अहवाल समितीस सादर करण्याच्या सूचना द्याव्यात. समितीने आवश्यक वाटल्यास योग्य त्या शिफारशीसह प्रस्तुत अहवाल शासनाकडे योग्य त्यां कार्यवाहीसाठी पाठवावा.