लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यातील सत्ताधारी सरकार महिलांसाठी योजना राबवून लाडकी बहिणीच्या नावाने गोडवे गात आहेत, त्याच सरकारच्या काळात महिलांबाबत अत्याचार वाढत आहेत. बहिणींना सुरक्षित ठेवणार नसाल, तर त्या सरकारचा काय उपयोग? अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली.

पीडित महिलांबाबत काही मंत्री वेळोवेळी चुकीची वक्तव्य करून असंवेदनशीलपणा दाखवत आहेत, हे राज्यासाठी अशोभणीय आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांकडे गांभिर्याने लक्ष देऊन मंत्र्यांना चाप लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचाराप्रकरणी सुळे यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधला.

सुळे म्हणाल्या, ‘स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर अत्याचाराची गलिच्छ घटना घडल्यानंतर हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नसून सरकारमधील अनेक मंत्री तरुणीवर असंवेदनशीलपणे बोलत आहेत. संबंधित तरुणीच्या सहमतीनेच सर्व काही झाले आहे, असे वक्तव्य करून तिच्या चारित्र्याचीच बदनामी करत आहेत. एकीकडे महिलांबाबत महायुती सरकार लाडकी बहीणसारख्या योजनेबद्दल मोठमोठे दावे करत आहे, तर दुसरीकडे राज्यात महिलांवर अत्याचार होत असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारच्याच आकडेवारीतून समोर येत आहे. सरकारने या घटनांकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे.’

‘मुख्यमंत्र्यांची अद्याप भेट नाही’

राज्यातील महिलांवर वाढत चाललेले अत्याचार तसेच बीड, परभणीसारख्या घटनांबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यालयीन भेट घेण्यासाठी मागील दोन आठवड्यांपासून प्रयत्न करत आहे. त्यांची अद्याप भेट झालेली नाही, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कसे?

देशपातळीवर महाराष्ट्राची बदनामी होत आहे. बीडसारख्या सुसंस्कृत आणि कष्टकऱ्यांच्या जिल्ह्याची दोन-तीन व्यक्तींमुळे देशभर बदनामी झाली आहे. बीडमधील आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात तसेच कृष्णा आंधळेच्या बाबतीत पोलिसांना ‘सीडीआर’ का मिळत नाहीत. आरोपी वाल्मिक कराड याच्यामागे एवढी मोठी सत्ता आणि यंत्रणा कशी राहिली. लाडकी बहीण योजनेमध्ये वाल्मिक कराड याला अध्यक्ष करायचा निर्णय कोणी घेतला. महादेव मुंडेंची हत्या झाली, तेव्हा कोणी फोन करून हा प्रश्न दाबण्याचा प्रयत्न केला. हार्वेस्टरच्या पैशाबाबत कोण सह्याद्री बंगल्यावर भेटीसाठी गेले? असे अनेक प्रश्न धनंजय मुंडे यांच्यासाठी आहेत. त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप आहेत, तरी ते मंत्रिमंडळात कसे? मुख्यमंत्र्यांनी विशेष कर्तव्य अधिकाऱ्यांबाबत (ओएसडी) दक्षता घेऊन कारभार सुरू केला आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे, पण अशा मंत्र्यांच्याबाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार, या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला द्यावे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.