scorecardresearch

MPSC : महत्त्वाची बातमी – राज्यसेवा २०२२ साठी ३४० पदांची भर

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा पदांचा आहे समावेश

MPSC : महत्त्वाची बातमी – राज्यसेवा २०२२ साठी ३४० पदांची भर
( संग्रहित छायचित्र )

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२मध्ये ३४० पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा पदांचा त्यात समावेश आहे. 

एमपीएससीने ही माहिती दिली. एमपीएससीतर्फे ११ मे रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात १६१ पदांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा २०२२च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्यसेवा २०२२च्या जाहिरातीमध्ये केवळ १६१ पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता गट अ आणि गट ब संवर्गाची मिळून ३४० पदे वाढल्याने एकूण ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

या पदांचा आहे समावेश –

वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाची ३३,  पोलीस उपअधीक्षक गट अ संवर्गाची ४१, सहायक राज्यकर आयुक्त गट अ संवर्गाची ४७, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ संवर्गाची १४, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ संवर्गाची दोन,  शिक्षणाधिकारी, गट अ संवर्गाची २०, प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) गट अ संवर्गाची सहा, तहसीलदार, गट अ संवर्गाची २५, सहायक गट विकास अधिकारी,गट ब संवर्गाची ८०, उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब संवर्गाची तीन, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब संवर्गाची दोन, उपशिक्षणाधिकारी, गट ब संवर्गाची २५, सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब संवर्गाची ४२ पदांचा समावेश असल्याचे एमपीएससीने नमूद केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.