पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत २८२ पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार असून, ९ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.

एमपीएससीने याबाबतची माहिती दिली. गट ब अराजपत्रित सेवेअंतर्गत राज्य कर निरीक्षक या पदाच्या २७९, तर सहायक कक्ष अधिकारी पदाच्या ३ जागा भरण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांना १ ते २१ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येणार आहे. तसेच, चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठीची मुदत २५ ऑगस्ट आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे ‘एमपीएससी’ने नमूद केले आहे.

उमेदवारांसाठी ‘एमपीएससी’च्या सूचना काय?

पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. या परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त या परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे.

त्यानुसार पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे किंवा संवर्ग पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. अशा सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्वपरीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्या आधारे या परीक्षेमधून भरायच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर, तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी, तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणासाठी पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर करणे आवश्यक राहील. पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्वपरीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची, त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही, असे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे.