महावितरणच्या नोटिसांमुळे प्रश्न ऐरणीवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगणकामध्ये ‘व्हायरस’ शिरल्यानंतर तो ज्याप्रमाणे यंत्रणेवर विपरीत परिणाम करतो, त्याच पद्धतीने काही उपकरणांमुळे निर्माण होणाऱ्या ‘हार्मोनिक्स’ अर्थात वीज यंत्रणेतील प्रदूषणामुळे वीजही खराब होते. क्लिष्ट आणि तांत्रिक असणारा हा विषय आजवर दुर्लक्षित राहिल्याने त्याचा विळखा आता सर्वदूर पसरत आहे. वीजपुरवठादार कंपन्यांच्या यंत्रणेत त्यातून दोष निर्माण होत आहेत.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ही समस्या सर्वाधिक आहे. वीज क्षेत्रातील अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या अस्तित्वात आल्यापासून गेली दोन दशके वीज यंत्रणेतील प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र त्याकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष करण्यात आले. आता ही समस्या हळूहळू गंभीर रूप धारण करीत असल्याने वीजपुरवठादार कंपन्यांचे त्याकडे लक्ष गेले आहे. त्यामुळे वीज यंत्रणेतील प्रदूषण कमी करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आजवर कोणत्याही वीज कायद्यामध्ये या गोष्टीवरील उपाययोजनांचा उल्लेखही नाही.

महावितरण कंपनीने पुणे विभागामध्ये उच्च दाब वीजग्राहकांना ‘हार्मोनिक्स’बाबत म्हणजेच वीज यंत्रणेतील प्रदूषणाबाबत नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. अशा नोटिसा आता राज्यभर पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंत्रणेतील प्रदूषणाची एक मर्यादा ‘इंटरनॅशनल इलेक्ट्रिकल्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स’ या संघटनेने ठरवून दिली आहे. त्याचाच आधार घेऊन त्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात येत आहेत. प्रदूषण कमी न केल्यास वीजपुरवठा बंद करण्याचा इशाराही या नोटिसांद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हार्मोनिक्स म्हणजे नक्की काय?

विजेवर चालणाऱ्या उपकरणांद्वारे ‘हार्मोनिक्स’ म्हणजेच वीज यंत्रणेत प्रदूषण निर्माण होते. एखादे उपकरण ठरावीक वारंवारितेनुसार (फ्रीक्वेन्सी) वीज घेत नाही. अगदी विचित्रपणे वीज घेण्याच्या या प्रकारातून यंत्रणेत एक विकृती येऊन प्रदूषण निर्माण होते. परिणामी संबंधित वीजग्राहकाची विजेची उपकरणे, वाहिन्या अचानकपणे गरम होतात. स्विच सातत्याने बंद होतात. काही उपकरणे जळण्याचाही धोका निर्माण होतो. ग्राहकाच्या यंत्रणेतील हे प्रदूषण वीजपुरवठादाराच्या यंत्रणेत पोहोचून अशाच प्रकारचे दोष निर्माण करते.

हार्मोनिक्स कमी करण्यासाठी ते निर्माण करणारी उपकरणे कमी करणे. ते शक्य नसल्यास ‘हार्मोनिक्स फिल्टर’ बसविण्याचा उपाय करता येतो; पण या गोष्टी अत्यंत खर्चीक आहेत. त्यामुळे या प्रश्नावर ग्राहकांना विश्वासात घेऊन जनजागृतीचा मार्ग निवडायला हवा. वीजपुरवठादार आणि ग्राहक यांच्या समन्वयानेच हा प्रश्न सुटू शकेल.  – राजीव जतकर, वीजतज्ज्ञ, ‘इकॅमचे माजी अध्यक्ष

वीज यंत्रणेतील प्रदूषणामुळे वीजपुरवठय़ाच्या दर्जावर परिणाम होत असल्याने प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने सध्या उच्चदाब ग्राहकांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत. ‘हार्मोनिक्स’विषयी अद्याप कायद्याने कोणतीही कारवाई करता येत नाही, मात्र ते नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित ग्राहकांना भाग पाडण्यात येत आहे. त्यासाठी जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे. – रामराव मुंडे, मुख्य अभियंता, महावितरण पुणे

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl electricity system pollution marathi articles
First published on: 28-05-2017 at 00:56 IST