पिंपरी : कर्जाच्या व्यवहारात पैशाची परतफेड न करता दमदाटी केल्याने आणि मानसिक त्रास सहन न झाल्याने एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सांगवीत उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५४ वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती यांच्याकडून आरोपीने दहा लाख रुपये उसने घेऊन दरमहा तीन टक्के व्याजाने परतफेड करण्याचे लेखी आश्वासन दिले. आरोपीने वर्षभर व्याज परत केले; मात्र त्यानंतर व्याज व मुद्दलाची परतफेड न करता उलट पैसे मागितल्यावर धमकावले. या आर्थिक ताणामुळे फिर्यादीच्या पतीने ११ ऑक्टोबर २०२५ राहत्या घरात सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
खाते क्रमांक बदलून कंपनीची ८१ लाखांची फसवणूक
कंपनीच्या व्हेंडरच्या बँक खात्यात फेरफार करून १६ लाख ८१ हजार ७४३ रुपयांचा आर्थिक अपहार केला. ही घटना बावधन येथे घडली.
याप्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून कंपनीच्या बँक खात्यातील व्हेंडर्स लाभार्थ्यांची माहिती बदलली. इतर खात्यांत पैसे वर्ग करून कंपनीची १६ लाख ८१ हजार ७४३ रुपयांचा अपहार करण्यात आला. बावधन पोलीस तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना दत्तनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तनगर कमानीजवळ सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी आपल्या मित्रासह दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने त्यांच्या पायावर आणि कमरेवर वार केला. त्यानंतर विद्यानगर येथेही आरोपींनी सीमेंटच्या गट्ट्याने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
रिक्षाचालकास मारहाण
रिक्षाने कट मारल्याच्या कारणावरून एकाने रिक्षाचालकास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे घडली. याबाबत रिक्षा चालकाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालवत असताना आरोपीशी किरकोळ कारणावरून वाद झाला. संतापलेल्या आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचा डावा हात फ्रॅक्चर झाला. दरम्यान, फिर्यादीच्या भावाने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी निगडी पोलीस तपास करत आहेत.
पिंपळे गुरव येथे जुगार अड्ड्यावर छापा
सांगवी पोलिसांनी पिंपळे गुरव येथील एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये १२ जणांवर गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून पत्त्यांची पाने, मोबाईल फोन, एक कार, आठ दुचाकी असा एकूण ११ लाख १४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. आरोपी तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रमोद गोडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
