लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यास महापालिकेकडून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार अपूर्ण रस्त्यांची यादी करण्याची सूचना क्षेत्रीय कार्यालयांना करण्यात आली आहे. विकास आराखड्यात कोणते रस्ते आहेत, याची माहिती जाहीर केली जाणार आहे.

महापालिकेच्या जुन्या हद्दीचा तसेच १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३७ गावांचा विकास आराखडा मंजूर झालेला आहे. या आराखड्यांमध्ये अस्तित्वातील रस्त्यांसोबतच नव्याने अनेक रस्त्यांची आखणी करण्यात आलेली आहे. बहुतांश जुन्या रस्त्यांच्या दुतर्फा पूर्वीपासूनच बांधकामे अस्तित्वात आहेत. मात्र, विकास आराखड्यातील त्याठिकाणची संभाव्य रस्ता रुंदी लक्षात न घेता जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे भविष्यात ही बांधकामे जमीनदोस्त करावी लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विकास आराखड्यातील रस्त्यांची यादी करण्याची सूचना क्षेत्रीय कार्यालयांना करण्यात आली आहे. त्यानुसार ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रस्तावित अपूर्ण रस्त्यांची माहिती यामध्ये असेल. त्यामुळे या जागांवर भविष्यात व्यवहार होणार नाहीत, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी दुपारी दोन तास वाहतूक ब्लॉक

यासंदर्भात बोलताना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले की, विकास आराखड्यातील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. मात्र, त्याची माहिती नसल्याने जमीन विक्रींचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची यादी तयार करण्याची सूचना करण्यात आली असून, ती यादी क्षेत्रीय कार्यालयामध्येही प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामध्ये रस्त्याची रुंदी, अंतर आणि नकाशे याची माहिती दिली जाणार आहे. या रस्त्यावर अतिक्रमणे किंवा बांधकामे होऊ नयेत, यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात ही यादी तयार होईल. त्यानंतर ती महापालिकेच्या संकेतस्थळावरही जाहीर केली जाईल.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड : पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू, झोपेत असतानाच काळाचा घाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकास आराखड्यानुसार रुंद करण्यात येणाऱ्या रस्त्यांवरही फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रियाही विनाअडथळा होण्यास मदत होईल. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून यापूर्वीही विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. मात्र, न्यायालयीन दावे, भूसंपादानाचे अडथळे यामुळे रस्ते विकसनाची प्रक्रिया रखडली होती.

विकास आराखड्यातील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. मात्र त्याची माहिती नसल्याने जमीन विक्रींचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची यादी तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. आठवडाभरात यादी तयार करून संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. -विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका