पुणे : बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरुन गेल्या एक वर्षांपासून सुरु असलेल्या वादात गाडीने कट मारल्याची भर पडली. त्यातून तिघांनी मिळून तरुणाच्या डोक्यात फरशीचा तुकड्याने वार करुन त्याचा खून केला.

प्रदीप बाबासाहेब अडागळे (वय २२, रा. आभाळवाडी, वाघोली) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी ऋषी काकडे व त्याची आई सुनिता काकडे (रा. थिटे वस्ती, खराडी) यांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ गुरुवारी रात्री अकरा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , काकडे यांचा भाजीचा व्यवसाय आहे. प्रदीप अडागळे आणि ऋषी काकडे यांच्यात बहिणीची छेड काढल्यावरुन गेल्या एक वर्षांपासून वाद होत होते़. गाडीने कट मारल्यावरुन गुरुवारी एका अल्पवयीन मुलाबरोबर प्रदीप अडागळे याचा वाद झाला होता. या वादातून चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ प्रदीप अडागळे याला बोलविले होते. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून तिघांनी मिळून प्रदीप अडागळे याच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करुन त्याला जबर जखमी केले.

जखमी अवस्थेत प्रदीप याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. चंदननगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृत्यु झाला. त्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.