घरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा खून करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. खुनामागचे कारण समजू शकले नसून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
गीता राजेशकुमार कुंभार (वय ४६, रा. ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ, पर्णकुटी पायथा, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. गीता यापूर्वीही अनेकदा घरातून बाहेर निघून गेल्या होत्या. रविवारी (३१ जुलै) त्या कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या झाडीत अडगळीच्या जागेत गीता मृतावस्थेत सापडल्या. त्यांच्या डोक्यात कठीण वस्तुने प्रहार करण्यात आला असून त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
गीता यांच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.