Murlidhar Mohol Targets Ravindra Dhangekar: केंद्रीय राज्यमंत्री व पुण्यातील भाजपाचे प्रमुख नेते मुरलीधर मोहोळ हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. त्याला कारण म्हणजे पुण्यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेले आरोप. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा थेट राजकीय वाद पाहायला मिळत आहे. त्यात आधी जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या वादातून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. आता कुणी कुणाच्या जाहिरातीसाठी व्हिडीओ केले त्यावरून वाद सुरू झाला आहे. रवींद्र धंगेकरांनी मोहोळांचा असाच एक व्हिडीओ शेअर करून त्यावरून टीका केली असताना त्यावर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे मुरलीधर मोहोळ यांच्या व्हिडीओमध्ये?
रवींद्र धंगेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्या जीबीबी प्रकल्पाची जाहिरात करताना दिसत आहेत. त्यात मुरलीधर मोहोळ या प्रकल्पातील सुविधांबाबत माहिती देताना दिसत आहेत. त्यावर “कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे”, अशी पोस्ट धंगेकरांनी केली होती. शिवाय, “कंपनीच्या भविष्यातील ३० हजार कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का?” असा प्रश्नही त्यांनी पोस्टमध्ये विचारला होता.
रवींद्र धंगेकर यांच्या पोस्टवर मोहोळ यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, रवींद्र धंगेकरांनी केलेल्या आरोपांना आता मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रवींद्र धंगेकर यांना चावी देणारं दुसरंच कुणीतरी असेल, असं सूचक विधान मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. तसेच, रवींद्र धंगेकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून हे आरोप करत आहेत, असंदेखील मुरलीधर मोहोळ म्हणाले.
“वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही”, असा टोला त्यांनी धंगेकरांना लगावला.
“विशाल गोखले माझा मित्र होता, आहे आणि राहणार आहे. ५ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो. पण तो ५ वर्षांपूर्वीचा आहे. तो काही काल-परवाचा नाही. जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा आणि मग बोला. कुणी कुणाची जाहिरात केली तर काय व्यवसायात भागीदार होतं का? या शहराची एक राजकीय संस्कृती आहे. एक माणूस या संस्कृतीची वाट लावत आहे”, अशा शब्दांत मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.