नारायणगाव : नारायणगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्याला एक हजार रुपये दंड करण्याबरोबरच संबधित व्यक्तीचा चौकात फलक लावण्याचा आणि त्याच्या घरी जाऊन उपरोधिक सत्कार करण्याचा अभिनव ठराव नारायणगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कचरा टाकणाऱ्याचे छायाचित्र काढून ग्रामपंचायतीला पाठविल्यास संबंधित व्यक्तीला ५०० बक्षीसही दिले जाणार आहे.

नारायणगाव ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती सरपंच शुभदा वाव्हळ आणि उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी दिली. ग्रामसभेला संतोष खैरे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, निलेश गोरडे, विकास तोडकरी, अजित वाजगे, सचिन विटे, भगवान कोऱ्हाळे, दीपक डेरे, जितेंद्र भोर, नंदू अडसरे आदी उपस्थित होते.

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या परिसरात कचऱ्याची समस्या वाढली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वाव्हळ होत्या. यावेळी ग्रामसेवक सचिन उंडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्याला एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ दंड आकारण्याऐवजी संबंधित व्यक्तीला कायमचा धडा शिकविण्यासाठी त्याचा कचरा करणारी व्यक्ती म्हणून भरचौकात फलक लावून त्याच्या घरी जाऊन कचरा टाकल्याबद्दल उपरोधिक पद्धतीने सत्कार करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गावाच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्याचे छायाचित्र काढून ग्रामपंचायतीला पाठविल्यास संबंधित व्यक्तीला ५०० रुपये बक्षीस देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

‘गावातील वीज, पाणी, रस्ते, पाणंद रस्ते, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. ते अंतिम मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून, सुरक्षिततेसाठी त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.’ असे सरपंच शुभदा वाव्हळ आणि उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी सांगितले.

‘गावातील ईएम द्रावण प्रकल्पाला आतापर्यंत २७ ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. ग्रामपंचायतीतील सर्व घरांमध्ये सौरउर्जा प्रकल्प लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नारायणगावची ‘सोलर सिटी’ म्हणून ओळख निर्माण होईल.’असे वाव्हळ म्हणाल्या.