Pune Navale Bridge Accident: पुणे शहरातील नवले ब्रीज येथे साडे पाच वाजण्याच्या सुमारास सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणार्‍या कंटेनर, ट्रक आणि चार चाकी वाहन एकमेकांवर आदळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये ट्रक आणि कंटेनरला आग लागली असून या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यातील जखमी नागरिकांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. तर अपघाताच्या घटनेमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

साताराहून मुंबईच्या दिशेने कंटेनर जात होता. नवले पुलाजवळील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढील सहा ते आठ वाहनांना कंटेनर चालकाने उडवल्याने तसेच ट्रक आणि कंटेनरच्यामध्ये एक चार चाकी अडकल्याने आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये सात जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन विभागाकडून मदतकार्य सुरू आहे.