जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर सोमवारी दुपारी साडेअकरा वाजता वेदमंत्राच्या जय घोषात नवरात्र महालामध्ये घटस्थापना करण्यात आली. घटस्थापना करताना उपस्थित भाविकांनी ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण केली.

यावेळी मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. विश्वास पानसे, अनिल सौंदडे, पोपट खोमणे, डॉ .राजेंद्र खेडेकर, व्यवस्थापक आशिष बाठे, खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे सदस्य, पुजारी गणेश आगलावे, मिलिंद सातभाई, चेतन सातभाई, बापू सातभाई ,धनंजय आगलावे, वरद दीडभाई, देवल बारभाई, शुभम बारभाई, हनुमान लांघी आदी उपस्थित होते .

पहाटे खंडोबा गडामध्ये नित्य भूपाळी झाल्यावर मुख्य गाभाऱ्यामध्ये पाखळणी करण्यात आली. श्री मार्तंड भैरवासह सर्व मूर्ती स्वच्छ करण्यात आल्या. देवांना नवीन पोशाख घातल्यावर वाजत-गाजत देवाच्या उत्सव मूर्ती नवरात्र महालामध्ये आणल्या. या ठिकाणी वेदमूर्ती सेवेकरी गुरुजी यांनी पौरोहित्य केले. दुपारी साडेअकरा वाजता खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींची घटस्थापना करण्यात आली.

तलवार उचलणे स्पर्धा

जेजुरीचा दसरा साऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. जेजुरी येथील काही कलावंत व्यवसायासाठी बाहेरगावी असतात. मात्र, नवरात्रीच्या काळात ते खंडोबा गडावर येऊन देवासमोर आपली कला सादर करतात. यालाच देवासमोर ‘हजेरी देणे’ असे म्हणतात. नऊ दिवस दिवसभर देवासमोर कलावंतांचे गायन व नृत्याचे कार्यक्रम होणार आहेत. दसऱ्याच्या दिवशी पालखीचे सीमोलंघन, तर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गडामधील प्राचीन खंडा (तलवार )उचलणे स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्थानिक कसरतपटू तयारी करीत आहेत. एका हातात खंडा जास्त वेळ उचलणे आण खंडा कसरतीमध्ये प्रथम येणाऱ्यांना श्री मार्तंड देवस्थान तर्फे प्रत्येकी ५० हजार रुपये इनाम देण्यात येणार आहे.