शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंचं भाषण अंतिम टप्प्यात येताच एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले होते. एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. दरम्यान त्यांच्या या भाषणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ‘काही भाषणं फारच लांबली, नको तिथे लांबली,” असं ते मिश्कीलपणे म्हणाले. ते बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोणाचं भाषण तुम्हाला आवडलं? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले “आवडी निवडीसाठी ही भाषणं नव्हती. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्यासाठी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर शिवसैनिक शिवाजी पार्कात येत होते. आता पिढ्या बदलल्या असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी येत आहेत”.

‘अवघ्या दीड वर्षाच्या नातवालाही नाही सोडलं’, उद्धव ठाकरेंच्या टीकेने एकनाथ शिंदे व्यथित, संताप व्यक्त करत म्हणाले “ज्या दिवशी…”

“काही भाषणं फारच लांबली”

अजित पवारांनी यावेळी शिंदे गटाला लक्ष्य करत म्हटलं की “एसटीला १० कोटी रुपये देऊन लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. मला काहींनी बसेस तिथे गेल्याने सणाच्या दिवशी इतर सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाल्याचं सांगितलं. अशा गोष्टी करता कामा नये. पण काही भाषणं फारच लांबली, नको तिथे लांबली. आता ती कोणती ते तुम्हीच ठरवा”.

Dasara Melava 2022 : हिंदूत्वाबाबत तडजोड नाही ; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

शिवसैनिकांना आवाहन

“भाषणाची सर्वांना उत्सुकता होती. दोन्हीकडे गर्दी झाली होती. मीडियानेही अनेकांच्या मुलाखती घेतल्या, त्यावेळी काहींनी आम्हाला का आणलं आहे हेच माहिती नाही असं सांगितल्याचं मी ऐकलं. माझे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरु होते. संध्याकाळी आईला भेटण्यासाठी गेल्यानंतर तिथे टीव्हीवर मी भाषणं ऐकली. त्यांच्या भाषणावर आम्ही टीका करण्याचं काही कारण नाही. पण महाराष्ट्रातील जनता आणि विशेषत: मतदारांनी, शिवसैनिकांनी आपण काय केलं पाहिजे, पुढील भूमिका काय असली पाहिजे, कोणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कोणाची मूळ शिवसेना आहे याचा विचार केला पाहिजे,” असं आवाहन अजित पवारांनी केलं.

तुमच्याकडून हिंदूविचारांना मूठमाती ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

“एकनाथ शिंदेंची काही वक्तव्यं राजकीय स्वरुपाची”

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या झेंड्याखाली राष्ट्रवादीचा अजेंडा राबवला जात असल्याची टीका केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “याला काही अर्थ नाही. तुम्ही मंत्रीमंडळात होता ना, ते माझ्या उजव्या बाजूलाच बसायचे. तेव्हा मी कधीच झेंडा शिवसेनेचा आहे, पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे असं ऐकलं नाही. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. १९९९ लादेखील आम्ही आघाडी केली होती. २००४, २००९ आणि आता २०२१ मध्येही केली होती. अडीच वर्षात जे काही निर्णय घेण्यात आले ते सर्वांनी मिळून घेतले होते. त्यांची काही वक्तव्यं राजकीय स्वरुपाची होती. त्याला फार काही महत्त्व द्यावं असं वाटत नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आरोप सिद्ध करुन दाखवा”

‘वेदान्त’मध्ये जास्त टक्केवारी मागितल्याने प्रकल्प गेला असा आरोप केल्यासंबंधी विचारलं असता अजित पवारांनी तो सिद्ध करुन दाखवा असं आव्हान दिलं. “टक्केवारी मागितली हे सिद्ध करुन दाखवा. हे धादांत खोटं आहे. वेदांतला सवलती देण्यासंबंधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जुलै महिन्यात बैठक झाली होती. आज त्यांच्या विचारांचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे. तरुणांचा रोष आपल्यावर येईल यासाठी हे वक्तव्य त्यांनी केलं. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना वेदान्त प्रकल्प येत असल्याची माहिती दिली होती आणि आता टक्केवारीबद्दल बोलायचं याला अर्थ नाही,” अशी टीका अजित पवारांनी केली.