मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाच्या वतीने पक्षाचा २६ वा वर्धापनदिनानिमित्त उद्या, मंगळवारी पुणे येथे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. अजित पवार गटाने बालेवाडी स्टेडियम येथे, तर शरद पवार गटाने बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन केले आहे.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्धापनदिनाची जोरदार तयारी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर वर्धापनदिनाला जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष छगन भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची प्रमुख भाषणे असतील. राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते आणण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. सुमारे २५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार गटाच्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख भाषणे असतील. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने सोहळ्याची सांगता होईल. सुमारे ५ हजार पदाधिकारी-कार्यकर्ते सोहळ्याला उपस्थित राहण्याचे नियोजन आहे.